बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक स्टारकिडने पदार्पण केलं आहे. यामध्ये आलिया भट, वरुण धवन, जान्हवी कपूर या स्टारकिडने स्वत:च स्थान भक्कम केलं असून आता लवकरच पुन्हा एक स्टार किड कलाविश्वामध्ये येण्यास सज्ज झाला आहे.दिवंगत अभिनेता अमरीश पुरी यांचा नातू वर्धन पुरी लवकरचं बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नुकताच त्याचा ‘ये साली आशिकी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या ट्रेलर लॉन्चवेळी वर्धनने त्याच्या आजोबांच्या अमरीश पुरी यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. सोबतच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी अमरीश पुरी यांनी वर्धनला दिलेला सल्ला कोणता हेदेखील सांगितलं.

माझ्या आजोबांनी अमरीश पुरी यांनी मला निधनापूर्वी बॉलिवूडविषयी एक सल्ला दिला होता. “अनेक जण नाटकांच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत असतात. मात्र रुपेरी पडद्यावर झळकल्यानंतर अनेक जण त्यांच्या खऱ्या पार्श्वभूमीला म्हणजेच थिएटरला विसरुन जातात. त्यांच्या वागण्या-बोलण्याची शैली बदलते. त्यांच्यात एक वेगळाच अॅडिड्यूड येतो. मात्र तू कसं कधीच वागू नकोस. या साऱ्याकडे केवळ करिअरचा भाग म्हणूनच बघ पण त्याला तुझ्या आयुष्याचा भाग होऊ देऊ नकोस”, असं अमरीश पुरी यांनी सांगितलं होतं.

पुढे त्यांनी सांगितलं, “तुझ्यातील आत्मा हा थिएटरमधील एक कलाकार आहे हे कायम लक्षात ठेव. कायम असं वाग ज्यामुळे तुझे पाय जमिनीवर राहतील. तुझे पाय जमिनीवर राहिले तरच तू यशस्वी होशील”. दरम्यान, वर्धनची मुख्य भूमिका असलेला ‘ये साली आशिकी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत शिवालिका ओबेरॉय स्क्रीन शेअर करणार आहे.