बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान नेहमी चर्चेत असतो. आमिरने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता आमिरप्रमाणे त्याचा मोठा मुलगा जुनैद खान बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जुनैदच्या बॉलीवूड पदार्पणाची चर्चा रंगली होती. जुनैदचा पहिला चित्रपट ‘महाराजा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

हा चित्रपट एका ऐतिहासिक महाकाव्यावर बेतलेला असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटात जुनैद एका पत्रकाराची भूमिका साकारत आहे. मात्र, चित्रपटाच्या फर्स्टलूकमध्ये जुनैदची भूमिका व लूकबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आमिर खान प्रोडक्शन या बॅनरखाली ‘महाराजा’ चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘महाराजा’ चित्रपटाच्या सेटवरचे जुनैदचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या चित्रपटात जुनैदबरोबर साई पल्लवी, शालिनी पांडे, शरवरी वाघ आणि जयदीप अहलावत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

बॉलीवूडमध्ये येण्याअगोदर जुनैदने तब्बल सात वर्षे रंगभूमीवर अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. अमेरिकन अकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स, लॉस एंजेलिसमधून त्याने अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. जुनैदने या अगोदर आमिर खान प्रॉडक्शन निर्मित ‘प्रीतम प्यारे’ या वेब सीरिजमध्येही काम केले आहे. याबरोबरच त्याने ‘लाल सिंह चड्ढा’च्या मुख्य भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. तसेच तो ‘लव्ह टुडे’ या साऊथ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्येही झळकणार असल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा- गुड न्यूज दिल्यानंतर आता दीपिका पदुकोणची जुनी मुलाखत होतेय व्हायरल; अभिनेत्री म्हणालेली, “मला भरपूर मुलं…”

‘महाराज’ व्यतिरिक्त जुनैद खान निर्माता म्हणूनही लवकरच पदार्पण करणार आहे. तो ‘प्रीतम प्यारे’ या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटात आमिर खान कॅमिओ करताना दिसणार आहे. आता जुनैदचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार की नाही हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.