‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने अवघ्या सहा दिवसांत बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली असली तरी, या चित्रपटावरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काही राज्यांमध्ये हा चित्रपट ‘टॅक्स फ्री’ करण्यात आला आहे, तर दुसरीकडे अनेक भागांमध्ये चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबत बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : ‘बिग बॉस ओटीटी’ सीझन-२ मधून करण जोहरचा पत्ता कट? ‘या’ अभिनेत्याकडे सोपवणार सूत्रसंचालनाची धुरा

एखाद्या चित्रपटामुळे राज्याच्या शांततेला धोका निर्माण होत असेल, तर त्यावर बंदी घालणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, “प्रत्येक माणसाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे, पण कायदा आणि सुव्यवस्था बिघडता कामा नये. सर्वप्रथम हे स्पष्ट करतो की, मी ‘द केरला स्टोरी’ हा सिनेमा पाहिलेला नाही. सध्या मी एवढा व्यस्त आहे की, मला माझ्या मुलीची (सोनाक्षी सिन्हा) ‘दहाड’ ही वेब सीरिज पाहण्यासाठीही वेळ नाही.”

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले, “देशात प्रत्येक व्यक्तीला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मीसुद्धा अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या बाजूने आहे, परंतु कोणत्याही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल किंवा एखाद्या चित्रपटामुळे राज्यातील शांततेला धोका निर्माण होत असेल, तर बंदी घालणे योग्य आहे.”

हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’नंतर अदा शर्मा दिसणार नव्या भूमिकेत! ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्यासोबत शेअर करणार स्क्रीन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ते म्हणाले, “ममता बॅनर्जी या दूरदृष्टीच्या नेत्या आहेत. चित्रपटामुळे (द केरला स्टोरी) राज्यात अशांतता पसरेल, किंवा हा चित्रपट एखाद्या विशिष्ट वर्गासाठी धोकादायक आहे, असे ममता बॅनर्जींना वाटत असेल, तर योग्य तो निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे. विवेक अग्निहोत्रींचा ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट रिलीज होण्याआधी मी काश्मिरी पंडितांच्या दुर्दशेबद्दल आवाज उठवला होता, पण त्या वेळी सरकारने लक्ष दिले नाही. या चित्रपटामुळे काश्मिरी पंडितांचे प्रश्न देशासमोर आले याचा आनंद आहे. संवेदनशील विषयांवर चित्रपट बनले पाहिजेत, पण ते संवेदनशील पद्धतीने बनवले पाहिजेत. निवडणुकांच्या काळात धर्मांतरावर आधारित चित्रपट का आला? अशा पद्धतीने निवडणुकांच्या काळात चित्रपट रिलीज करणे ही वेळ संशयास्पद वाटते.”