Sushmita Sen Talk About Heart Attack Surgery : लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेनला फेब्रुवारी २०२३ मध्ये ‘आर्या’ सीरिजच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगदरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. काही वृत्तांनुसार, तिच्या धमन्यांमध्ये ९५ टक्के ब्लॉकेज होते, त्यामुळे तिची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया करताना तिनं डॉक्टरांकडे तिला शुद्धीत ठेवण्याची अट ठेवली होती. याबद्दल तिनं स्वत:च एका मुलाखतीत सांगितलं आहे.
सुश्मिताने दिव्या जैन यांच्या पॉडकास्टमध्ये सांगितले की, “मी डॉक्टरांना स्पष्टपणे सांगितलं होतं की, मला शस्त्रक्रियेदरम्यान बेशुद्ध व्हायचे नाही. माझ्या स्वभावातला ‘कंट्रोल फ्रीक’ बेशुद्ध होणे अजिबात पसंत करत नाही, कदाचित यामुळेच मी वाचले. कारण तो एक असा क्षण होता की, त्यात त्रास सहन करत शुद्धीत राहणे किंवा बेशुद्ध होऊन झोपणे आणि कदाचित पुन्हा न जागणे हे काही पर्याय माझ्यासमोर होते. ज्यापैकी मी शुद्धीत राहण्याचा निर्णय तेव्हा घेतला होता.”
ती पुढे म्हणाली, “मी पूर्ण वेळ शुद्धीत होते आणि तसेच राहण्याची माझी इच्छा होती. मला वेदना कमी करायच्या नव्हत्या. मला माझ्या शरीरात काय चालले आहे ते पाहायचे होते. मी सतत डॉक्टरांशी बोलत होते, त्यांना काम लवकर करण्यास सांगत होते, कारण मला लवकरात लवकर सेटवर परत जायचे होते. माझी संपूर्ण टीम जयपूरमध्ये माझी वाट पाहत होती.”
पुढे सुश्मिता म्हणाली, “जेव्हा तुम्ही एखाद्या शोमध्ये प्रमुख भूमिकेत असता, तेव्हा तुमच्यावर एक मोठी जबाबदारी असते. जवळपास ५०० लोकांचे कुटुंब तुमच्यावर अवलंबून असते. पूर्ण टीम माझी काळजी करत होती; पण मला ही काळजी होती की माझ्यामुळे त्यांचं काम बंद पडलं आहे. माझ्याशिवाय शूटिंग होऊ शकत नव्हते. मी उपचार पूर्ण केले होते, प्रकृती ठीक होती, म्हणून मला कामावर परत जायचेच होते. त्यांनी मला विश्रांती करण्यासाठी खूप आग्रह केला, पण मग १५ दिवसांनी मला ‘आर्य’ सीरिजच्या शूटिंगसाठी परत जाण्याची परवानगी मिळाली.”
सुश्मिता सेननं क्राईम-थ्रिलर असलेल्या ‘आर्या’ या सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केलं. या सीरिजमध्ये तिने अपघातानं आपल्या नवऱ्याचं ड्रग्ज व्यवसायाचं साम्राज्य सांभाळावं लागलेल्या स्त्रीची भूमिका साकारली. तिच्या या भूमिकेला प्रेक्षक आणि समीक्षकांकडूनही पसंतीची पावती मिळाली.
१९९६ साली विक्रम भट्टनं दिग्दर्शित केलेल्या ‘दस्तक’ चित्रपटातून सुष्मितानं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. सुश्मिताचं हे बॉलीवूडमधील पदार्पण बॉक्स ऑफिसवर मात्र यशस्वी ठरलं नव्हतं. नंतर १९९९ मध्ये ती डेव्हिड धवन यांच्या ‘बिवी नंबर 1’ सिनेमात झळकली. मग सुष्मितानं ‘आँखे’, ‘मैं हूँ ना’, ‘मैंने प्यार क्यूं किया’, ‘समय’, ‘मैं ऐसा ही हूं’, ‘तुमको भूला ना पायेंगे’, ‘फिलहाल’सारख्या चित्रपटांतून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.
