Aishwarya Rai : बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि एके काळची मिस वर्ल्ड असलेल्या ऐश्वर्या रायने दिल्ली न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. आपली ओळख आणि व्यक्तिमत्वाच्या सुरक्षेच्या कारणास्तव ऐश्वर्या राय दिल्ली उच्च न्यायालयात पोहचली. तिने न्यायलायकडे ही दाद मागितली की तिचे AI द्वारे आक्षेपार्ह फोटो तयार करुन त्यांचा उपयोग व्यावसायिक पद्धतीने केला जातो आहे. आपल्या व्यक्तिगत ओळख अधिकाराचं हे हनन आहे असं तिने न्यायालयाला सांगितलं. ज्यानंतर तिला न्यायालयाने दिलासा दिला आहे. ऐश्वर्या राय ही सुप्रसिद्ध अभिनेत्री तर आहेच पण ती अमिताभ बच्चन यांची सून आहे. तसंच आजवर तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तिच्या फोटोंचा गैरवापर होणं ही बाब नक्कीच चिंताजनक आहे असं तिच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं
नेमकं काय आहे प्रकरण?
दिल्ली उच्च न्यायालयात ऐश्वर्या रायचे वकील संदीप सेठी यांनी ऐश्वर्या रायची बाजू मांडली. प्रसिद्धीसाठी काही वेबसाईट्स आणि युट्यूब चॅनल्स तसंच सोशल मीडिया हँडल्स ऐश्वर्या रायचे AI द्वारे तयार केलेले फोटो वापरत आहेत. यातले काही फोटो आक्षेपार्हही आहेत. त्यामुळे मी न्यायालयाकडे ही मागणी करतो आहे की या वेबसाईट्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन हे फोटो हटवण्यात यावेत. माझ्या अशील ऐश्वर्या राय यांचे एआयद्वारे तयार करण्यात आलेले फोटो हे वॉलपेपर म्हणून, टी शर्ट प्रिटिंगसाठी आणि कॉफी मग्सवर छापण्यासाठी वापरुन ते विकून त्यातून पैसे कमावले जात आहेत.

आक्षेपार्ह फोटोही पोस्ट केल्याची वकिलांची न्यायालयाला माहिती
राजीव सेठी यांनी हा दावाही केला की काही वेबसाईट्स आणि युट्यूब चॅनल्सनी ऐश्वर्या रायचे आक्षेपार्ह फोटो एआयच्या मदतीने तयार केले आहेत. अशा पद्धतीचे फोटो माझ्या अशील ऐश्वर्या राय यांनी कधीही काढलेले नाहीत तसंच अशा पद्धतीचे फोटो काढण्याची संमतीही कधी दिलेली नाही. ऐश्वर्या राय एके काळची विश्वसुंदरी आहे. तसंच ती एक उत्तम अभिनेत्रीही आहे. तिचे फोटो अशा पद्धतीने वापरुन त्यांचा व्यावसायिक वापर करणं तसंच आक्षेपार्ह फोटो तयार करणं या बाबी दुर्दैवी आहेत न्यायालयाने यात लक्ष घालावं अशी विनंती राजीव सेठी यांनी केली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
न्यायालयाचा ऐश्वर्या रायला दिलासा
दरम्यान न्यायालयाने राजीव सेठी यांच्यामार्फत ऐश्वर्या रायची बाजू ऐकल्यानंतर या प्रकरणात १५१ युआरएल्स शोधली आहेत आणि ही युआरएल्स तातडीने हटवण्याचे आदेश दिले आहेत. ही URLs तातडीने हटवण्यात यावीत तसं न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. या प्रकरणात आता पुढील सुनावणी १५ जानेवारी २०२६ ला होणार आहे.