Shreya Ghoshal’s concert chaos: श्रेया घोषाल ही तिच्या अनेक गाजलेल्या गाण्यांसाठी ओळखली जाते. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात तिचा चाहतावर्ग आहे. तिने विविध भाषांमधील चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत.
श्रेया घोषाल कॉन्सर्टमधूनदेखील चाहत्यांच्या भेटीस येते. तिचे कॉन्सर्ट जगभरात होतात. तिच्या या कार्यक्रमांना चाहत्यांची मोठी गर्दी होते. श्रेयाला प्रत्यक्षात गाताना ऐकणे, पाहणे ही चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असते. नुकताच गायिकेचा ओडिशा राज्यातील कटकमध्ये कॉन्सर्ट आयोजित केला होता.
श्रेया घोषालच्या कॉन्सर्टमध्ये मोठा गोंधळ
बालीयात्रा मैदानात हा कॉन्सर्ट आयोजित केला होता. या कॉन्सर्टला मोठी गर्दी झाली होती. मात्र, यादरम्यान मोठा गोंधळ निर्माण झाला. मिळालेल्या माहितीनुसार, गर्दीने धक्काबुक्की करायला सुरुवात केली. स्टेजजवळ हा प्रकार घडला. इतकी धक्काबुक्की सुरू झाली की स्टेजजवळील लोक स्वत:ला त्यातून वाचवण्याचा प्रयत्न करत होते. श्रेयाला पाहण्यासाठी हा गोंधळ निर्माण झाला होता.
या सगळ्यात दोन जण बेशुद्ध पडले, ज्यामध्ये एका तरुणीचा समावेश आहे. त्यांना लगेचच उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने आयोजक आणि पोलिसांनी गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवला. लाठीचार्ज करून गर्दीला नियंत्रित केले. या सगळ्यात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. हा कॉन्सर्ट बालीयात्रादरम्यान आयोजित केला होता.
बालीयात्रा
५ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर यादरम्यान बालीयात्रा सुरू होती. बालीयात्रेच्या शेवटच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम आणि सेलिब्रिटी प्रोगाम यांचे आयोजन केले जाते.
श्रेया घोषालची अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत. बॉलीवूडमधील एक यशस्वी गायिका म्हणून तिची ओळख आहे. ती काही गाण्यांच्या रिअॅलिटी शोची जज म्हणूनही काम करते. तिथे आलेल्या स्पर्धकांना ती प्रेरित करते, त्यांना मार्गदर्शन करते. अनेकदा ती स्वत:देखील काही गाणी गाताना दिसते. सध्या ती इंडियन आयडॉल १६ मध्ये जज म्हणून काम करत आहे.
