बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर ११ सप्टेंबर रोजी रात्री गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली होती. उत्तर प्रदेशातील बरेली या ठिकाणी सिव्हिल लाईन्स परिसरात ही घटना घडली होती. या घटनेनंतर या प्रकरणातील हल्लेखोरांचा तपास पोलिसांकडून करण्यात येत होता. दरम्यान, यात या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलीस चकमकीत दोन संशयित हल्लेखोरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हे शूटर कोण होते आणि यांचं एन्काऊंटर कसं झालं याची माहिती जाणून घेऊ.
११ सप्टेंबरला दिशा पटानीच्या घराबाहेर गोळीबार
११ सप्टेंबर रोजी रात्री पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारात वापरलेल्या मोटारसायकलवरून त्यांचा माग काढण्यात आला. दरम्यान, दिल्ली पोलीस, उत्तर प्रदेश आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाई दरम्यान चकमक झाली. या चकमकीत दोन्ही गुन्हेगार गंभीर जखमी झाले. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी एका निवेदनात ही माहिती दिल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

सीसीटीव्ही फुटेजमुळे सापडले आरोपी
या संपूर्ण घटनेत सीसीटीव्ही फुटेज हा मोठा धागा ठरला. सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांनी या दोन आरोपींना शोधलं. दोघांचे गुन्हेगारी रेकॉर्ड काय आहेत ते देखील तपासण्यात आले आणि त्यानंतर या दोघांना शोधण्यात आलं. प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य यांचा अपमान झाल्याने हे कृत्य केल्याचं या टोळीने म्हटलं होतं. पोलीस आरोपींचा माग काढत होते. त्यांना हे समजलं की आरोपी ट्रोनिका भागात आहेत. पोलीस तिथे पोहचल्यावर चकमक झाली.
पोलीस गाझियाबादच्या ट्रोनिका भागात पोहचल्यावर काय झालं?
पोलीस गाझियाबादच्या ट्रोनिका भागात पोहचले. तिथे पोलिसांनी या दोघांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी गोळीबार सुरु केला. त्याला उत्तर देताना पोलिसांनीही गोळ्या झाडल्या. या दरम्यान दोन्ही आऱोपींना गोळ्या लागल्या. तर एका पोलीस शिपायाला गोळी लागली. आरोपींनी पोलिसांच्या व्हॅनवरही गोळ्या झाडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कोण आहेत हे आरोपी?
पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन आरोपी जखमी झाले. रविंद्र आणि अरुण अशी या दोन्ही आरोपींची नावं आहेत. दोघंही हरियाणाचे रहिवासी होते. पोलिसांनी त्यांच्याकडून एक पिस्तुल, काडतुसं आणि दिशा पटानीच्या घराजवळ गोळीबार करण्यासाठी वापरलेली बाईक जप्त केली आहे. दोन्ही आरोपींचे मृतदेह आता शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. दिशा पटानी ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. तसंच बॉलिवूडची ती चर्चेत असलेली अभिनेत्री आहे.