आज इमरान हाश्मी हा त्याच्या हटके भूमिकांसाठी अन् उत्तम चित्रपटांच्या निवडीसाठी ओळखला जात असला तरी एकेकाळी तो ‘सिरियल किसर’ म्हणून अधिक लोकप्रिय होता. ‘फुटपाथ’ या चित्रपटापासून सुरुवात केलेल्या इमरानने नंतर ‘मर्डर’, ‘आशिक बनाया आपने’, ‘अक्सर’सारख्या चित्रपटातून स्वतःच्या सिरियल किसर या प्रतिमेला आणखी ग्लोरिफाय केलं. हळूहळू त्याने त्याची ही प्रतिमा बदलायला सुरुवात केली अन् हटके भूमिकांची निवड त्याने केली.

तुम्हाला माहितीये का की इमरानने त्याच्या पहिल्या चित्रपट ‘फुटपाथ’साठी स्वतःचे नाव बदलले होते. नुकतंच इमरानने ‘मॅशेबल इंडिया’च्या ‘द बॉम्बे जर्नी’ या कार्यक्रमात हजेरी लावली अन् त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले. तसेच या मुलाखतीदरम्यान इमराननेदेखील चित्रपटासाठी नाव बदलल्याचा खुलासा केला आहे.

आणखी वाचा : पंकज उधास यांची पत्नी फरीदा यांनी त्यांच्या पहिल्या अल्बमसाठी ‘अशी’ केलेली पैशांची जमवा जमव

इमरान म्हणाला, “मला वाटतं की माझ्या पहिल्या चित्रपटाच्या क्रेडिटमध्ये तुम्हाला माझं नाव फरहान हाश्मी असं पाहायला मिळेल. तेव्हा मी माझं नाव बदलून फरहान ठेवलं होतं. माझ्या आजोबांचा अंकशास्त्रावर फार विश्वास होता अन् त्यांच्या आग्रहाखातरच मी माझं नाव बदललं होतं. त्यावेळी एका सद्गृहस्थाने मला माझे नाव बदलण्यासाठी दोन पर्याय दिले होते. एक पर्याय होता माझे नाव फरहान ठेवणे तर दूसरा पर्याय होता की ‘इमरान’च्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये आणखी एक ‘A’ हे अक्षर लावणे जेणेकरून ते नाव ‘Emraan’ असे होईल.”

तेव्हा इमरानने त्याचे नाव फरहान ठेवायचा निर्णय घेतला अन् नाव बदलले. पुढे इमरान म्हणाला, “मी फरहान हे नाव लावायचे ठरवले अन् तो चित्रपट फ्लॉप ठरला. अन् त्यानंतर मी पुन्हा माझे नाव बदलायचा निर्णय घेतला अन् दुसऱ्या पर्यायानुसार चित्रपटासाठी मी ‘Emraan’ हेच नाव वापरायचे ठरवले अन् माझा दूसरा चित्रपट सुपरहीट झाला, अन् तेव्हापासूनच मी हेच नाव ठेवायचा निर्णय घेतला.” अनुराग बसू दिग्दर्शित ‘मर्डर’ हा इमरानचा दूसरा चित्रपट होता ज्याची निर्मिती त्याचे काका मुकेश भट्ट यांनी केली होती. या चित्रपटात इमरानबरोबर मल्लिका शेरावतही झळकली अन् याच चित्रपटापासून इमरानला ‘सिरियल किसर’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं.