प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांच्या निधनाच्या वृत्ताने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला. आपल्या जादुई आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा आवाज हरपला. वयाच्या ७२व्या वर्षी पंकज उधास यांनी मुंबईतल्या ब्रीचकँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. शेवटपर्यंत पंकज उधास हे लाईव्ह स्टेज परफॉर्मन्स करायचे. ‘चिट्ठी आई है’, ‘चांदी जैसा रंग है तेरा’ अशी एकाहून एक उत्कृष्ट गाणी त्यांनी प्रेक्षकांना दिली. पण आपल्या पहिल्या अल्बमच्या प्रदर्शनादरम्यान मात्र त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता.

एका जुन्या मुलाखतीमध्ये पंकज उधास यांनी खुलासा केला होता की त्यांच्या पहिल्या अल्बमसाठी त्यांनी त्यांच्या पत्नीकडून पैसे उधार घेतले होते. ‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंकज यांनी हा किस्सा सांगितला होता. त्यावेळी पंकज यांचं फरीदा यांच्याशी लग्नही झालं नव्हतं. त्यावेळी फरीदा यांच्याकडेही फारसे पैसे नव्हते तरी त्यावेळी त्यांनी पंकज उधास यांना मदत केली अन् ती गोष्ट पंकज यांनी कायम स्मरणात ठेवली.

आणखी वाचा : “मी जेव्हा ते पात्र साकारलं…” ‘अ‍ॅनिमल’मधील नकारात्मक पात्राबद्दल बॉबी देओल स्पष्टच बोलला

मुलाखतीदरम्यान पंकज म्हणाले, “मी जेव्हा माझा पहिला अल्बम प्रदर्शित करणार होतो तेव्हा माझ्याकडे काही हजार रुपये कमी होते. फरीदाकडेही पैसे नव्हते, तेव्हा आमचं लग्नही झालं नव्हतं. पण पुढच्या दिवशी तिने ती रक्कम गोळा करून मला दिली. तिने ते पैसे उधारीवर घेतले होते. ती गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही. त्यानंतर आम्ही एकमेकांना वचन दिलं की आमच्यात कितीही भांडणं किंवा वाद झाले तरी आम्ही धर्मावरून एकमेकांशी वाद घालणार नाही.”

शेजारच्या नातेवाईकांनी पंकज यांची पत्नी फरीदा यांच्याशी पहिली भेट करून दिली होती. त्यावेळी पंकज उधास पदवीचे शिक्षण घेत होते. तर फरीदा हवाई सुंदरी होत्या. शेजारच्या नातेवाईकांनी दोघांची भेट करून दिल्यानंतर त्यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. सतत एकमेकांबरोबर वेळ घालवू लागल्यानंतर दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पंकज व फरीदा यांच्या नात्यात धर्म आड येत होता. पण पंकज उधास त्यांच्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी फरीदा यांच्याशीच लग्न केलं.