प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान (Hina Khan) गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे. अभिनेत्री गेले काही दिवस ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे आणि यासाठी ती अनेक तपासण्या आणि ऑपरेशन्सला सामोरी जात आहे. हिना खानला स्वत:च्या आजाराबद्दल कळताच ती अजिबात खचून गेली नाही आणि तिचा हाच गुण चाहत्यांनादेखील आवडला.
अभिनेत्री तिच्या आजारपणातही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियाद्वारे ती तिच्या आजारपणाबद्दलची माहिती देते. अशातच तिने अभिनेता संजय दत्तबद्दल (Sanjay Dutt) भाष्य केलं आहे. अभिनेत्याने तिला आजारपणात कशी साथ दिली याविषयी सांगितलं आहे. ‘पिंकव्हिला’शी झालेल्या संभाषणात हिना खानने कर्करोगाचे निदान झाल्याचे कळताच संजय दत्तने तिच्या आजारपणाबद्दल चौकशी केल्याचे सांगितले.
संजय दत्तबद्दल बोलताना हिना खानने म्हटलं की, “मी दुसऱ्या दिवशी त्यांना भेटले. आम्ही काही वेळ एकत्र घालवला. आम्ही आमच्या प्रवासाबद्दल चर्चा केली. या काळात सकारात्मक राहण्याचा सल्ला त्यांनी मला दिला. हिना, लक्षात ठेव, तुला कधीच कर्करोग झाला नव्हता, आताही नाही आणि तुला तो कधीच होणार नाही, फक्त हे लक्षात ठेव, बाकी काही नाही.”
पुढे संजय दत्तने तिला कसे प्रोत्साहन दिले याबद्दल हिना म्हणाली की, “माझ्या आजारपणाबद्दल त्यांना माहिती झाली याचे मला आश्चर्य वाटले. मी शेअर केलेल्या व्हिडीओद्वारे लोकांपर्यंत सकारात्मकता पोहोचवण्याचा आणि यावर मात करता येऊ शकते हे सांगणे माझा हेतू होता, म्हणून मी ते केलं. पण, संजय दत्त माझ्याशी संपर्क साधेल असे मला कधीच वाटले नव्हते.”
या मुलाखतीत हिना खानने तिच्या कर्करोगाच्या प्रवासाबद्दल बरेच काही सांगितले. कर्करोगानंतरचा प्रवास तिच्यासाठी सोपा नव्हता. स्वतःसोबतच, अभिनेत्रीने कुटुंबाचीही काळजी घेतली. या आजाराची बातमी कळल्यानंतर तिची आई नमाज पठण करत होती आणि नंतर ती बाल्कनीत बसून एकटीच रडली.
तसेच, हिनाच्या वडिलांची आठवण काढताना अभिनेत्रीने असेही म्हटले की, जर ते आज इथे असते तर मला या अवस्थेत आणि वेदनांमध्ये ते पाहू शकले नसते. माझ्या वडिलांनी मला राणीसारखे ठेवले होते आणि ते हे दुःख सहन करू शकले नसते.
दरम्यान, कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानने तिच्या या उपचारादरम्यानच्या काळात अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. तिने फॅशन शो केला, शिवाय ती ‘बिग बॉस’मध्येही सहभागी झाली होती. त्यामुळे आजारपणात खचून न जाता हिना खान सतत काही ना काही करत आहे.