पटकथा लेखक हनी इराणी आणि गीतकार-कवी जावेद अख्तर यांचा घटस्फोट होऊन अनेक दशकं उलटली आहेत. अनेकांना माहीत नाही की १९७० च्या दशकात ‘सीता और गीता’ चित्रपटाच्या सेटवर एकत्र काम करताना हे दोघे प्रेमात पडले होते. घटस्फोटानंतर जावेद यांनी शबाना आझमींशी दुसरं लग्न केलं, तर हनी एकट्या राहिल्या. आता जावेद व हनी यांची खूप चांगली मैत्री आहे.

फिल्मफेअरला दिलेल्या संभाषणात हनी इराणी यांनी त्यांच्या नात्यातील सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितलं. “हो, हे खरंय की ‘सीता आणि गीता’च्या शूटिंगदरम्यान मी जावेद सरांच्या प्रेमात पडले. एकदा त्यांनी मला एका खेळादरम्यान एक कार्ड निवडायला सांगितलं आणि तो खेळ ते जिंकले. त्यावर ‘तू माझ्यासाठी खूप लकी आहेस, मला वाटतं मी तुझ्याशी लग्न करायला हवं,’ असं ते मस्करीत म्हणाले. मग आम्ही सात ते आठ महिने डेटिंग करत होतो,” असा खुलासा हनी यांनी केला.

घटस्फोटाबद्दल हनी इराणी म्हणाल्या…

जावेद व हनी यांनी नंतर लग्न केलं. त्यांना झोया व फरहान ही मुलं झाली. १३ वर्षांच्या संसारानंतर हे दोघे वेगळे झाले. घटस्फोट झाला त्यावेळची परिस्थिती कशी सांभाळली, याबद्दल हनी यांनी सांगितलं. “जावेद अख्तर यांच्याशी विभक्त होण्याच्या काळात मी प्रचंड रागात होते, पण कधी खूप ड्रामा केला नाही. आमचं लग्न टिकणार नाही, याची कल्पना मला होती. मी नेहमीच म्हणते की, आमचा घटस्फोट कधीच शबानामुळे झाला नाही. कदाचित ते (जावेद) माझ्यापेक्षा पूर्णपणे वेगळं काहीतरी शोधत असावेत. आमच्यात खूप प्रेम आणि आदर आहे. मला माहीत आहे की ते कधीही असं काहीच बोलणार नाही किंवा असं काहीच करणार नाही ज्यामुळे माझ्या मुलांना नुकसान होईल. याबद्दल मला विश्वास आहे. यामुळेच कदाचित सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या,” असं हनी म्हणाल्या.

अभिनेता-चित्रपट निर्माता फरहान अख्तरनेही त्याच्या पालकांच्या घटस्फोटाचा त्याच्यावर कसा परिणाम झाला याबद्दल जाहीरपणे सांगितलं आहे. “ते कठीण होते. अर्थात, त्याचं एक कारण म्हणजे मी लहानपणी पालकांचा घटस्फोट पाहिला होता. त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या मुलांबरोबर असं करू शकत नाही याची जाणीव आधीपासूनच होती,” असं फरहान म्हणाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.