गेल्या अनेक पिढ्यांनी डोक्यावर घेतलेल्या शोले या चित्रपटाला ५० वर्षे झाली आहेत. १९७५ मध्ये आजच्याच दिवशी शोले प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने इतिहासच रचला नाही तर हा चित्रपट हिंदी सिनेसृष्टीतला ‘आयकॉनिक’ चित्रपट ठरला. या चित्रपटात गब्बर सिंग हा खलनायक म्हणजेच अमजद खान. अमजद खान गब्बर सिंग साठी पहिली निवड नव्हता. मात्र सलीम जावेद यांच्या आग्रहामुळे अमजद खान यांची एंट्री झाली आणि पुढे इतिहास घडला. अमजद खान यांची एंट्री गब्बर सिंग म्हणून कशी झाली? आणि गब्बर हे नाव कसं सुचलं याचा किस्सा सलीम जावेद म्हणजेच सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी सांगितला होता.

गब्बर सिंग नाव कसं सुचलं?

“गब्बर हे नाव कसं आलं तुम्हाला माहीत आहे का? सलीम खान यांचे वडील मोठे पोलीस अधिकारी होते. त्यांचे किस्से मला सलीम खान सांगत असत. एकदा त्यांनी मला गब्बर नावाच्या डाकूचा किस्सा सांगितला. गब्बर नावाचा खरोखरचा डाकू होता, तो कुत्रे पाळायचा, असा किस्सा मला सांगितला होता. आम्ही ‘शोले’ लिहायला बसलो तेव्हा खलनायकाचं नाव काय असेल यावर विचार सुरु होता आणि मला आठवलं मी त्यांना म्हणालो सलीम तुम्ही तो गब्बरचा किस्सा सांगितला होतात. आपल्या सिनेमातल्या व्हिलनचं नाव गब्बर ठेवलं तर? क्षणाचाही विलंब न करता सलीम खान हो म्हणाले. सलीम खान यांनी हे नाव सांगितलं होतं आणि मी सुचवलं आणि शोलेतला व्हिलन गब्बर सिंग झाला.” अशी आठवण जावेद अख्तर यांनी राज ठाकरेंनी घेतलेल्या मुलाखतीत सांगितली होती. मात्र प्रश्न होता भूमिका कोण करणार याचा? अमजद खान हे गब्बरच्या भूमिकेसाठी पहिली निवड नव्हते. डॅनी यांना ती भूमिका देण्यात आली होती. मात्र सलीम जावेद यांनी अमजद खान यांना आणलं आणि शोले नावाचा इतिहास घडवला.

अमजद खान यांची निवड गब्बरसाठी कशी झाली?

जावेद अख्तर म्हणाले, “१९६३ मध्ये मी एक युथ फेस्टिव्हल पाहिला होता. तिथे एक नाटक झालं होतं ज्याचं नाव होतं ‘ऐ मेरे वतन के लोगो’ मी त्यात अमजद खानला पाहिलं होतं. मी आणि सलीम खान बरोबर काम करु लागलो तेव्हा मी सलीम खान यांना अनेकदा सांगितलं होतं, की अमजद खान नावाचा एक चांगला मुलगा आहे, चांगलं काम करतो. आम्ही ते विसरलोही होतो. शोले सिनेमासाठी गब्बर म्हणून कुणाला घ्यायचं? यावर आम्ही विचार करु लागलो तेव्हा मला सलीम खान यांनी सुचवलं की तुम्ही एका मुलाची तारीफ करत होतात त्याला बोलवू. आता अमजद खानचं काम मी पाहिलं होतं. पण त्याचं नाव सलीम खान यांनी सुचवलं. ज्यानंतर आम्ही त्याचं नाव सुचवलं.”

डॅनी यांची निवड का झाली नाही?

गब्बरच्या भूमिकेसाठी आम्ही डॅनी यांची निवड केली होती. मात्र त्याने धर्मात्मा सिनेमासाठी तारखा दिल्या होत्या. आता शोले करावा की धर्मात्मा हा प्रश्न त्याच्यापुढे होता. धर्मात्माचं शुटिंग अफगाणिस्तानमध्ये होणार होतं. डॅनीला वाटलं आऊटडोअर शुटिंग आहे आपण तिकडे जावं म्हणून तो तिकडे गेला. असाही किस्सा जावेद अख्तर यांनी सांगितला.