Javed Akhtar slams Pakistani Actress Bushra Ansari : पाकिस्तानी अभिनेत्री बुशरा अन्सारीने काही आठवड्यांपूर्वी जावेद अख्तर यांच्यावर टीका केली होती. मुंबईत जावेद यांना कोणीही घर भाड्याने देत नाही, तसेच त्यांनी गप्प बसावं असं ती म्हणाली होती. आता ज्येष्ठ गीतकार-लेखिका यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी कधी बोलावं आणि कधी नाही हे सांगणारी ती कोण आहे? असं जावेद यांनी बुशराला विचारलं.

लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर म्हणाले, “एक पाकिस्तानी अभिनेत्री बुशरा अन्सारी आहे, ती अनेकदा माझ्याबद्दल बोलत असते. तिने एकदा मला गप्प राहण्याचा सल्ला दिला. ती म्हणाली, ‘नसीरुद्दीन शाह गप्प राहतात, तुम्हीही गप्प राहा.’ माझा तिला प्रश्न आहे: ‘ती कोण आहे जी मला सांगेल की मी कधी बोलावं आणि कधी नाही? तुला हा अधिकार कोणी दिला आणि मी तुझा सल्ला ऐकेन अशी अपेक्षा तुला का आहे?'”

भारताचा उल्लेख करत जावेद अख्तर म्हणाले, “आपल्या देशात अनेक समस्या असतीलही, पण जर कोणी बाहेरचा माणूस टीका करायला आला तर मी भारतीय आहे. ते हे का विसरतात? मी गप्प बसणार नाही.” अभिनेत्रीने दावा केला होता की जावेद यांना मुंबईत भाड्याने घरही मिळत नाही, असं सांगितल्यावर ते उपहासात्मकपणे म्हणाले, “हो, मी आणि शबाना गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर झोपत आहोत. खरंच काय बोलावं आता?” असं बोलून जावेद अख्तर हसू लागले.

जावेद अख्तर यांनी सांगितला जुना किस्सा

जावेद म्हणाले, “२५ वर्षांपूर्वी शबानाला गुंतवणुकीसाठी फ्लॅट खरेदी करायचा होता. पण ब्रोकरने सांगितलं की मालक त्याचं घर मुस्लिमांना विकणार नाही. पण त्यामागचं कारण वेगळं होतं. मालकाचे आई-वडील सिंधमध्ये राहत होते, जिथून या पाकिस्तानी लोकांनी त्यांना हाकलून लावले होते. इतका मोठा आघात सहन केल्यानंतर कोणतीही व्यक्ती त्या घरमालकासारखीच प्रतिक्रिया देईल? त्या दिवशी शबानाला तो फ्लॅट देण्यास नकार देण्यात आला होता, पण त्याचं कारण ती मुस्लीम असणं नव्हतं तर मालकाला आलेल्या अनुभवाचा त्याला बदला घ्यायचा होता. माझ्यावर टीका करणारी आणि मला गप्प राहण्यास सांगणारी ती (बुशरा अन्सारी) कोण आहे? तिने आधी स्वतःकडे पाहावे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाली होती बुशरा?

२२ एप्रिलला पहलगाममध्ये २६ पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेचा देशभरातून निषेध करण्यात आला होता. जावेद अख्तर यांनीही गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात भाषण केलं होतं. त्यात ही गोष्ट आपण विसरायला नको, ही लहान गोष्ट नाही, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्री बुशरा अन्सारीने टीका केली होती. “आमचे कथित लेखक, त्यांना तर फक्त निमित्त हवं होतं. खरं तर त्यांना मुंबईत भाड्याने घरही मिळायचं नाही. आता गप्प बसा. नसीरुद्दीन शाहदेखील एका कोपऱ्यात गप्प बसले आहेत ना?” असं बुशरा म्हणाली होती. आता तिला जावेद अख्तर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.