ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह त्यांच्या ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ या वेब सीरिजच्या नव्या सीझनमुळे चर्चेत आहेत. ते यात मुघल सम्राट अकबराची भूमिका साकारत आहेत. नुकतंच त्यांनी एका मुलाखतीमध्ये प्रचारकी चित्रपट, सध्याच्या सरकारकडून मुस्लीम द्वेषाला घातलं जाणारं खतपाणी यांवर भाष्य केलं, ज्यामुळे ते चर्चेत आले. आधीसुद्धा बऱ्याचदा आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नसीरुद्दीन शाह चर्चेत आले होते.

मुस्लीम लोकांचा द्वेष करणं ही एक प्रकारची फॅशनच झाली आहे, असं नसीरुद्दीन शाह ‘द इंडियन एक्सप्रेस’शी संवाद साधताना म्हणाले. इतकंच नव्हे तर त्यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. याच मुलाखतीमध्ये त्यांनी ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाबद्दलही उघडपणे भाष्य केलं आहे. हा चित्रपट पाहणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा : “मुस्लिमांचा द्वेष ही फॅशनच…” नसीरुद्दीन शाह यांचं सत्ताधारी पक्षाबद्दल मोठं वक्तव्य

याबद्दल नसीरुद्दीन म्हणाले, “या चित्रपटामुळे ‘भीड’, ‘अफवाह’, ‘फराज’ यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांना बराच फटका बसला आहे. हे तीन चित्रपट पाहण्यासाठी लोक आले नाहीत, पण ‘द केरला स्टोरी’साठी लोकांनी बॉक्स ऑफिसवर तोबा गर्दी केली. मी ‘द केरला स्टोरी’ बघितलेला नाही आणि भविष्यात तो बघेन असंही मला वाटत नाही कारण त्याबद्दल मी बरंच ऐकलं, आहे वाचलं आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटाबद्दल बोलताना नसीरुद्दीन यांनी हा धोकादायक ट्रेण्ड असल्याचंही स्पष्ट केलं. याबरोबरच हे कलुषित वातावरण बदलेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. ‘द केरला स्टोरी’बद्दल अशा रीतीने भाष्य करणारे नसीरुद्दीन शाह हे एकमेव अभिनेते नाहीत. याआधी कमल हासन, अनुराग कश्यप यांच्यासारख्या कलाकारांनीही या चित्रपटाचा प्रोपगंडा चित्रपट म्हणून उल्लेख केला आहे.