सध्या हॉलिवूड गाजवणारी आपली देसी गर्ल म्हणजेच प्रियांका चोप्रा ही भारतात आली आहे. अलीकडे तिच्या कुटुंबात अनेक खास कार्यक्रम होते पण तेव्हा ती भारतात येऊ शकली नाही. आता इतक्या दिवसांनी ती पती निक जोनास आणि मुलगी मालतीसोबत मुंबईत आली आहे. आता ती भारतात येण्यामागील एका खास कारणाची माहिती समोर आली आहे. प्रियांका चोप्रा मुंबईत असून सध्या तिच्या डोक्यात अनेक गोष्टी सुरू असल्याचं स्पष्ट झालं आहे. ती वेगवेगळ्या स्क्रिप्ट्स वाचत आहे त्यापैकी एक संजय लीला भन्साळी यांचा प्रोजेक्ट असल्याचे वृत्त समोर आले आहे.

प्रियांका चोप्राचे भारतात वेगवेगळे फिल्म प्रोजेक्ट सुरू आहेत. ‘हिंदुस्तान टाईम्स’कडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांकाचा हा मुंबई दौरा पूर्णपणे तिच्या कामावर केंद्रित करण्यासाठी अन् अपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी असल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी ती सतत वेगवेगळ्या लोकांच्या भेटी घेत आहे. याबरोबरच तिला तिच्या प्रोडक्शन हाऊसच्या कामावरही लक्ष केंद्रित करायचे आहे.

आणखी वाचा : ‘पठाण’चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद तब्बल २३ वर्षे जुन्या ‘या’ सुपरहीट चित्रपटाचा काढणार सीक्वल

तिच्या पुढच्या हिंदी चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे आणि तिला लवकरच तिचा प्रोजेक्ट फायनल करायचा आहे असे मीडिया रिपोर्टनुसार स्पष्ट झाले आहे. यासाठीच ती वेगवेगळ्या स्क्रिप्ट वाचत आहे आणि लोकांची भेट घेत आहे जेणेकरून लवकरात लवकर ती तिच्या आगामी चित्रपटाबद्दल घोषणा करू शकेल. प्रियांका लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये झळकू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

एका वेगळ्या कालखंडातील ॲक्शन प्रोजेक्टसाठी प्रियांकाने संजय लीला भन्साळी यांचीही भेट घेतल्याचे वृत्त समोर आले आहे आणि आता टाइमलाइन, वेळापत्रक आणि वेशभूषा ठरवण्यासाठी ती संजय यांना भेटली आहे असंही सांगण्यात येत आहे. अद्याप या प्रोजेक्टविषयी कुठलीच अतिरिक्त माहिती समोर आलेली नाही, पण असेही बोलले जात आहे की प्रियांका लवकरच ‘सिटाडेल’च्या दुसऱ्या सीझनची घोषणा करणार आहे. प्रियांका फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’मध्येदेखील दिसणार होती, यामध्ये तिच्याबरोबर आलिया भट्ट कतरिना कैफ या अभिनेत्रीदेखील मुख्य भूमिकेत दिसणार होत्या, पण या चित्रपटातून काही कारणास्तव प्रियांका बाहेर पडल्याने हा चित्रपटही डब्यात गेल्याचं सांगितलं जात आहे. प्रियांका लवकरच नेमकी काय घोषणा करणार याची तिच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.