Raveena Tandon : गेल्या अनेक महिन्यांपासून देशभरात भटक्या कुत्र्यांचा मुद्दा चर्चेत आला आहे. एकीकडे प्राणीप्रेमी किंवा भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांसाठी हा मुद्दा भावनिक झालेला असताना या कुत्र्यांमुळे प्रचंड मनस्ताप आणि प्रसंगी शारिरीक इजा सहन कराव्या लागणाऱ्यांसाठी हा मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयातील या प्रकरणाच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच दोन सदस्यीय खंडपीठाने ११ ऑगस्ट रोजी दिलेला निर्णय बदलून नवे निर्देश दिले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे हे न्यायालयाने आज दिलेले आदेश जरी राजधानी दिल्लीशी निगडित प्रकरणी दिले असले, तरी ते देशातील सर्व राज्यांना लागू असतील, असं न्यायालयाने नमूद केलं आहे. या आदेशानुसार रेबीज झालेले श्वान आणि आक्रमक श्वान सोडून इतर सर्व श्वानांची सुटका केली जाणार आहे. याबाबत रवीना टंडनने पोस्ट केली आहे.
रवीना टंडनची पोस्ट काय?
डॉगेश भाई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. सद्बुद्धीचा विजय झाला. सर्वोच्च न्यायालयाचे आणि सरन्यायाधीशांचे आभार. आता या कुत्र्यांची नसबंदी आणि निर्बिजीकरण यांची प्रक्रिया नीट पार पाडली जावो या सदिच्छा. असं म्हणत रवीना टंडनने पोस्ट लिहिली आहे. रवीना प्रमाणेच अभिनेता जॉन अब्राहमनेही सुटकेचा निश्वास सोडला आहे. चांगल्या दिशेने योग्य पाऊल असं म्हणत जॉनने पोस्ट केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश काय?
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नव्या आदेशांनुसार, राजधानी दिल्लीतून ताब्यात घेतलेल्या सर्व भटक्या कुत्र्यांना लसीकरण व निबिजीकरण केल्यानंतर सोडण्यात येणार आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता व न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यामध्ये फक्त ज्या कुत्र्यांना रेबिजची लागण झाली आहे किंवा जे कुत्रे आक्रमक वर्तन करताना दिसत आहेत, अशा कुत्र्यांनाच फक्त त्यांच्यासाठीच्या निवारा केंद्रांमध्ये ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भात १० दिवसांपूर्वी म्हणजेच ११ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने दिलेल्या निर्णयात न्यायालयाने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने काय सूचना केल्या आहेत?
१) ज्या कुत्र्यांना पकडून शेल्टर होममध्ये बंद करण्यात आलं आहे त्यांना त्या विभागात पुन्हा सोडलं जाणार
२) प्रत्येक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी विशिष्ट परिसर तयार केला जाईल. हा परिसर सोडून इतर कुठेही खाऊ घालण्यास मज्जाव असेल.
३) फिडिंग झोन तयार करण्यासाठी एनजीओंना २५ हजार रुपये दिले जाणार
४) श्वानप्रेमी कुत्रे दत्तक घेण्यासाठी अर्ज करु शकतात. एकदा दत्तक घेतलेल्या कुत्र्याला, कुत्र्यांना पुन्हा रस्त्यावर सोडता येणार नाही.
५) कुत्र्यांचं निर्बिजीकरण करुन त्यांना सोडलं जाईल.
६) सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाऊ घातल्यास, अशा व्यक्तीच्या विरोधात कारवाई केली जाईल. आम्ही आमच्या निकालाची कक्षा देशभरासाठी रुंदावत आहोत. देशभरात भटक्या कु्त्र्यांची समस्या जिथे आहे तिथे हे निकष लागू असतील असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.