अमिताभ बच्चन व रेखा यांचं एकमेकांवर प्रेम होतं, असं म्हणतात. पण खूप लोकांना माहीत नाही की रेखा यांची अमिताभ बच्चन यांच्याशी भेट जया भादुरींमुळे झाली होती. इतकंच नाही तर जया यांच्याच घरी त्या पहिल्यांदा अमिताभ यांना भेटल्या होत्या.
जया व अमिताभ यांनी लग्न केलं, त्यापूर्वीपासून या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. दोघीही एकाच इमारतीत राहत होत्या. जया यशाच्या शिखरावर होत्या तर रेखा यांच्या करिअरचा तो सुरुवातीच काळ होता. जया रेखाला करिअर व आयुष्याबद्दल अनेक मोलाचे सल्ले द्यायच्या, असा दावा एका पुस्तकात करण्यात आला आहे.
“अमिताभ आणि अन्वर (मेहमूदचे भाऊ) जवळचे मित्र होते. अन्वरने मला सांगितलं की त्याने अमिताभ आणि जया यांना अनेकदा लाँग ड्राईव्हवर नेलं होतं. दोघे कारच्या पुढच्या सीटवर बसायचे, तर रेखा मागच्या सीटवर बसायच्या आणि ते प्रवासात एकमेकांशी गप्पा मारायचे,” असं लेखकाने ‘मेहमूद: अ मॅन ऑफ मेनी मूड्स’मध्ये लिहिलं आहे. यासंदर्भात जनसत्ताने वृत्त दिलंय.

२०१६ मध्ये ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ हे रेखा यांच्यावरील पुस्तक यासर उस्मान यांनी लिहिलं होतं. या पुस्तकात ‘दीदीभाई’ नावाने जया बच्चन यांच्याशी संबंधित काही किस्से तसेच रेखा व जया यांच्या मैत्रीबद्दलही लिहिलंय. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने पुस्तकाच्या संदर्भाने दिलेल्या माहितीनुसार, “सुरुवातीचे काही चित्रपट हिट झाल्यावर रेखा यांनी १९७२ मध्ये मुंबईत स्वतःचा फ्लॅट विकत घेतला होता. हॉटेल अजिंठा सोडून रेखा १८ व्या वर्षी त्या जुहूच्या बीच अपार्टमेंटमध्ये राहायला गेल्या होत्या. त्याच बिल्डिंगमध्ये अभिनेत्री जया भादुरी राहत होत्या, त्यावेळी जया इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. बीच अपार्टमेंटमध्ये रेखा आणि जया अनेकदा भेटत असत. रेखा प्रेमाने जयांना ‘दीदीभाई’ म्हणायच्या आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी वारंवार त्यांच्या फ्लॅटवर जायच्या. तिथेच रेखा यांची पहिली भेट जयाचे प्रियकर अमिताभ बच्चन यांच्याशी झाली होती.”
जया बच्चन स्टार होत्या आणि अमिताभ बच्चन संघर्ष करत होते. “त्या काळी गर्लफ्रेंड जया अमिताभ यांचा मोठा आधार होत्या. त्या बिग बींपेक्षा खूप यशस्वी होत्या आणि त्यांनी अनेक निर्मात्यांना बिग बींचे नाव सुचवले होते,” असं लेखकाने पुस्तकात लिहिलं आहे.