समीर जावळे

Santosh Movie : सआदत हसन मंटो यांनी लिहिलेली एक ‘बू’ नावाची कथा आहे. या कथेत वेश्यागमन करणाऱ्या रणधीर नावाच्या तरुणाला एका ‘घाटी’ वेश्येच्या शरीराचा वास (बू) आवडतो. तो मग ती ‘बू’ शोधत अस्वस्थ होत राहतो. त्याचं लग्न होतं तरीही डोक्यातून, मनातून ती ‘बू’ जात नाहीं. त्या कथेत मंटो म्हणतात, “उस बू में एक बदबू भी थी और खुशबू भी.” अगदी त्याचं लग्न होतं तरीही रणधीर ती ‘बू’ परत मिळेल का? या शोधात राहतो. कथेचा हा संदर्भ आठवण्याचं कारण म्हणजे नुकताच पाहिलेला ‘संतोष’ नावाचा चित्रपट. संतोष सैनी या महिला कॉन्स्टेबलच्या आयुष्याभोवती फिरणारा हा चित्रपट. या चित्रपटात आपल्याला जात व्यवस्थेबाबत आणि धर्मांधतेबाबत मंटोंनी जे इतक्या वर्षांपूर्वी लिहून ठेवलंय तेच जाणवतं. अनेकांच्या डोक्यातून ‘जात’ गेलेली नाही. पोलीस आहोत म्हणून डोक्यात हवा जाते आणि मग हवं ते करु शकतो, वाटेल तसं सगळं काही वळवू शकतो ही मानसिकता यात अधोरेखित झाली आहे.

पोलीस आपल्या समाजाचा अविभाज्य भाग आहेत पण…

पोलीस हे आपल्या समाजाचा एक अविभाज्य भाग आहेत. खरंतर आपल्या आयुष्याचाही. छोट्यातल्या छोटी घटना असो किंवा अगदी मोठा गुन्हा त्याची उकल करण्याचं काम पोलीस करत असतात. पोलिसांकडे कायद्याचे रक्षक म्हणूनच पाहिलं जातं. मात्र पोलिसी व्यवस्थेला जर जातव्यवस्थेची धर्मांधतेची कीड लागली असेल तर? असं पोलीस खरंच करत असतील का? का करत असतील? काय घडत असेल? या सगळ्याची उत्तरं आपल्याला ‘संतोष’ नावाच्या चित्रपटात मिळतात. शहाना गोस्वामीची प्रमुख भूमिका असलेला आणि संध्या धुरी यांचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट भारतात बॅन करण्यात आला आहे. मात्र ‘संतोष’ हे पोलिसी व्यवस्थेचं भयाण वास्तव आहे.

चित्रपटाची कथा थोडक्यात काय?

संतोष सैनी नावाची एक महिला आहे. तिचा पती वारला आहे. हवालदार असलेल्या पतीचा मृत्यू एका हिंदू मुस्लिम दंगलीत होतो. संतोष सैनी (शहाना गोस्वामी) त्याची विधवा आहे. ती पदर ओढून जेव्हा तिच्या सासरी जाते तेव्हा “तू डायन है.. हमारे बेटे को खा गयी.” हे तिला सासरच्या लोकांकडून ऐकायला मिळतं. त्यानंतर ती पोहचते पती ज्या पोलीस ठाण्यात होता तिथे. तिच्या नशिबाने तिला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळते. त्यानंतर समोर येतं एका अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्येचं प्रकरण. या प्रकरणात गीता शर्मा (सुनीता राजवर) नावाची एक पोलीस अधीक्षक दाखवली आहे. संतोष आणि गीता या दोघी मिळून हे प्रकरण रुढार्थाने सोडवतात. पण या सगळ्या प्रकरणात संतोषला आलेले अनुभव, तिने पाहिलेलं वास्तव आणि अनुभवलेलं जग आणि समोर आलेलं सत्य या सगळ्या गोष्टी तिचं मन सुन्न करतात आणि अर्थातच आपल्यालाही प्रेक्षक म्हणून अस्वस्थ करतात.

Santosh Movie News
संतोष या चित्रपटात शहाना गोस्वामी प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट आपल्याला प्रेक्षक म्हणून अस्वस्थ करुन जातो.

चित्रपटात जात आणि धर्म यांच्यावर थेट भाष्य

पोलीस, त्यांची काम करण्याची पद्धत, स्पृश्य-अस्पृश्यतेच्या भिंती मुस्लिमांबाबत असलेला राग, लाचखोरी, महिला पोलिसांना हिणवलं जाणं या सगळ्या गोष्टी किती टोकाच्या आहेत याचं वास्तववादी चित्रण चित्रपटात करण्यात आलं आहे. कायद्याने दिलेले अधिकार आणि पोलिसांचं सत्य या दोन गोष्टींमधला कमालीचा विरोधाभास संतोष मध्ये चित्रित करण्यात आला आहे. त्यामुळेच हा चित्रपट आपल्याला सून्न करतो. अगदी चित्रपटात दाखवलेल्या संतोष प्रमाणेच आपलीही अवस्था होते.

सिनेमाला दोन ओळींचा संवाद या चित्रपटाचं सार आहे

“संतोष इस देश में दो तरह के छुत-अछुत है. एक वो जिसे कोई छुना नहीं चाहता और दुसरा वो जिसे कोई छू नहीं सकता.” या एका संवादात चित्रपटाचं सगळं सार एकवटलेलं आहे. चित्रपटात अनेक प्रभावी संवाद आहेत. या संवादाने आपलं मन आतून खळबळून जातं. संतोष सिनेमा चित्रित करताना घेतलेली एक खास खबरदारी आहे ती म्हणजे संतोष ही मध्यवर्ती भूमिका आपण प्रेक्षक म्हणून तिच्याच नजरेतून हा सिनेमा पाहतो. त्यामुळेच क्लायमॅक्सच्या प्रसंगानंतर तिला मिळणारा धक्का हा आपल्यालाही मिळतोच.

धाटणीतल्या पोलीसपटांपेक्षा कैकपटीने वेगळा आहे ‘संतोष’

हिंदी चित्रपटसृष्टीत पोलिसांची प्रतिमा सगळं काही घडून गेल्यावर शेवटी येणारे म्हणून रंगवण्यात आली आहे. ‘अर्धसत्य’, ‘शक्ती’ ‘जंजीर’, ‘अब तक छप्पन’, ‘द्रोहकाल’, ‘सिंघम’, ‘मर्दानी’, ‘दबंग’ असे काही मोजके चित्रपटही आहेत ज्यात पोलीस आणि त्यांची काम करण्याची पद्धत हाताळण्यात आली आहे. मात्र यातल्या काही मोजक्या चित्रपटांचा अपवाद सोडला तर सगळं चित्रण हे बऱ्यापैकी फिल्मी आहे. संतोष मात्र या चित्रपटांना अपवाद ठरतो. अल्पवयीन मुलीचं बेपत्ता असणं त्यानंतर बलात्कार आणि हत्येची घटना घडेपर्यंत जे काही घडतं त्यात पोलीस कसे वागतात, वातावरण तापल्यानंतर, जनक्षोभ उसळल्यानंतर पोलीस कसे वागतात हे सगळं सगळं यात जसंच्या तसंच दाखवलं गेलं आहे. चित्रपटाची कथा उत्तर प्रदेशातल्या एका गावातली आहे. जाती धर्माची मूळं खेडेगावांमध्ये किती घट्ट रुजून आणि रुतून बसली आहेत यावरही ‘संतोष’ भाष्य करतो.

संतोषच्या नजरेतूनच आपण प्रेक्षक म्हणून सिनेमाकडे पाहतो

पोलीस अधीक्षक गीता आणि पोलीस हवालदार संतोष यांच्यातल्या एका संवादाचा एक प्रसंग आहे तो जबरदस्त जमला आहे. चित्रपट कलात्मक पातळीवर एका वेगळ्या उंचीवर पोहचलेला आहे. कारण सिनेमाला एक संथ लय आहे. ‘संतोष’च्या नजरेतून आपण तिथवर पोहचत राहतो. नवरा अचानक मारला गेल्याने तिला आलेलं वैधव्य. त्यातून सासरच्या मंडळींनी केलेली अवहेलना, तिचं अस्वस्थ होऊन नवऱ्याच्या खाकी रंगाच्या वर्दीकडे पाहणं हे सगळं संध्या सुरींनी मोजक्या प्रसंगांमध्ये उत्तम टिपलं आहे. महिला कॉन्स्टेबलला दिलेलंं संतोष हे नावही पुरुष व्यवस्थेचं प्रतीकात्मक रुपक म्हणून वापरलं गेलं आहे.

शहाना गोस्वामी आणि सुनीता राजवर या दोघींचा उत्तम अभिनय

संतोष सिनेमा खऱ्या अर्थाने जगली आहे ती शहाना गोस्वामी. सिनेमा तिच्या भोवतीच फिरतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शहाना यात ‘संतोष’ वाटते. अनेकदा अनेक अभिनेते, अभिनेत्रींना आपली ‘इमेज’ मोडावीशी वाटत नाही. पण शहाना गोस्वामी या समजुतीला अपवाद ठरली आहे. ‘संतोष’च्या भूमिकेत ती पाण्यासारखी विरघळून गेली आहे. दुसरं महत्त्वाचं नाव म्हणजे सुनीता राजवर अर्थात या सिनेमातली अधिकारी गीता शर्मा. सुनीता राजवर या चित्रपटात पोलीस अधीक्षक कसा बेफिकरीने वावरु शकतो? हा एक प्रश्न स्वतःला विचारत आपल्या अभिनयाचे रंग भूमिकेत भरले आहेत. गीता शर्मा या एसएचओची बेफिकीरी आपल्याला अस्वस्थ करुन जाते. वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी पोलीस खात्यात राहून कशा आणि किती मुरुन जातात हे त्यांनी या चित्रपटात प्रभावीपणे दाखवलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतात चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे

संतोष जो निर्णय चित्रपटाच्या शेवटी घेते तो निर्णय पाहून आपलं मन हेलावून जातं. हा चित्रपट पॉपकॉर्न मूव्ही नाही. जात व्यवस्था, पोलीस यंत्रणा आणि त्याला लागलेली वास्तवाची धग यावर परखड भाष्य चित्रपट करतो. एखादा काटा पायात घुसला की बाहेर पडेपर्यंत जसा ठसठसत राहतो तशाच वेदना देणारा हा चित्रपट आहे. सध्या चित्रपटावर बंदी आहे पण प्रदर्शित झाल्यावर हा नक्की पाहता येईल आणि कायम स्मरणात राहिल असाच हा चित्रपट आहे.