बॉलीवूड किंग शाहरुख खान नेहमी चर्चेत असतो. अभिनयाच्या जोरावर शाहरुखने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर शाहरुख मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करीत तो चाहत्यांना अपडेट देत असतो. जगभरात शाहरुखचे लाखो चाहते आहेत. शाहरुखबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यास चाहते नेहमीच उत्सुक असतात.

शाहरुखने टेलिव्हिजनवरून करिअरला सुरुवात केली. मालिकेपासून चित्रपटांपर्यंतचा शाहरुखचा प्रवास म्हणावा तेवढा सोपा नव्हता. शाहरुखच्या कठीण काळात त्याला मदत केली ती निर्माते विवेक वासवानी यांनी. वासवानी यांनी शाहरुखला चित्रपटात केवळ लॉंचच केले नाही, तर संघर्षामय काळात त्याला आपल्या घरी राहण्यास जागाही दिली होती. एकेकाळी विवेक व शाहरुख खास मित्र मानले जायचे. दरम्यान, नुकत्याच एका मुलाखतीत विवेक यांनी शाहरुखशी संबंधित अनेक किस्से सांगितले आहेत.

हेही वाचा- “नवरा म्हणून माझ्यात काय कमी होती?” घटस्फोटानंतर आमिर खानने किरण रावला विचारलेला प्रश्न; ती म्हणालेली, “तुला नेहमी…”

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत विवेक यांनी शाहरुखबाबत अनेक खुलासे केले आहेत. ते म्हणाले, “शाहरुख आणि मी एकमेकांशी बोलतही नाही आणि भेटतही नाही. पण जेव्हा कधी आम्ही एकमेकांना भेटतो, तेव्हा आम्हाला आम्ही कालच भेटलो होतो, असं वाटतं. मी मुंबईत राहत नाही. मी शिक्षक आहे. मी एका शाळेचा मुख्याध्यापक आहे. मी दिवसातील १८ तास काम करतो. तसेच बस व लोकल ट्रेनने प्रवास करतो. तर, शाहरुख सुपरस्टार आहे.”

या मुलाखतीत विवेक यांना, ते शाहरुखला भेटण्याचा प्रयत्न का करीत नाहीत, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “शाहरुखकडे १७ फोन आहेत आणि माझ्याकडे एकच फोन आहे. त्यानं फोन उचलला, तरच मी बोलू शकेन. ‘जवान’नंतर मी त्याला फोन केला; पण त्यानं माझा फोन उचलला नाही. त्यानंतर मी एकदा अंघोळ करीत होतो, तेव्हा शाहरुखनं मला फोन केला होता. त्यामुळे मी फोन उचलू शकलो नाही.”

हेही वाचा- उर्वशी रौतेलाने वाढदिवसाच्या दिवशी कापला चक्क २४ कॅरेट सोन्याचा केक; किंमत तब्बल…

शाहरुख खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, साल २०२३ शाहरुखसाठी खूपच खास ठरले. गेल्या वर्षी शाहरुखचे पठाण, जवान व डंकी हे चित्रपट प्रदर्शित झाले. या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. आता लवकरच शाहरुख ‘टायगर व्हर्सेस पठाण’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर सलमान खानची प्रमुख भूमिका आहे. यशराज बॅनरच्या स्पाय युनिव्हर्सअंतर्गत बनविण्यात येणाऱ्या या चित्रपटात दोघांचे अॅक्शन सीन्स बघायला मिळणार आहेत.