शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून सध्या चांगलाच वाद पेटला आहे. चित्रपटातील बोल्ड दृश्ये आणि दीपिका पदुकोणने परिधान केलेली भगवी बिकिनी यामुळे हिंदूंचा अपमान होत असल्याचा आरोप हिंदू महासभा आणि काही भाजपा नेत्यांनी केला आहे. अशातच चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणीही सोशल मीडियावरही जोर धरू लागली आहे. त्यामुळे चित्रपट निर्माते चित्रपटातील आक्षेप असलेले दृश्य बदलतील की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच शाहरुख खानने कोलकात्यात चित्रपट आणि सोशल मीडिया याबद्दल महत्त्वाची विधानं केली आहेत.

शाहरुख खानने कोलकाता चित्रपट महोत्सवासाठी हजेरी लावली. यावेळी त्याने सोशल मीडियाच्या वापराबद्दल भाष्य केलं. “माणसाला मर्यादा घालणाऱ्या अशा विशिष्ट प्रकारच्या संकुचित दृष्टिकोनावर सोशल मीडिया पोसला जातो. मी असं वाचलंय की, नकारात्मक वातावरणात सोशल मीडियाचा वापर अधिक वाढतो. नकारात्मक विचार यामुळे अशा प्रकारे एकत्रित येतात की त्याचा परिणाम फूट आणि विध्वंस असाच असतो,” असं शाहरुख खान कोलकात्यात बोलताना म्हणाला.


पुढे आपल्या भाषणात शाहरुख खानने सिनेमाला आधुनिक काळातील सर्वात महत्त्वाचे माध्यम म्हणत त्याचे महत्त्व सांगितले. दरम्यान, शाहरुख खानने त्याचं भाषण एका दमदार संवादाने संपवलं. “तुमचे सीटबेल्ट बांधून घ्या. हवामान खराब होणार आहे. आम्ही काही दिवसांपासून इथे आलेलो नाही. तुम्हाला भेटू शकलो नाही. पण आता जग सामान्य झालं आहे. आम्ही सर्व आनंदी आहोत. जग वाट्टेल ते करू देत, पण मी आणि तुम्ही आपण सगळे सकारात्मक आहोत. सर्व जिवंत आहोत,” असं शाहरुख म्हणाला.