बॉलिवूड इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित आणि सुपरहिट चित्रपट शोले पुन्हा एकदा रिलीज होणार आहे. यंदा शोले ओरिजनल क्लायमॅक्ससह रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या रि- रिलीजवर काम करणारी कंपनी हेरिटेज फाउंडेशनने शोलेला 4K मध्ये तयार केले असून ‘शोले द फायनल कट’ असं या चित्रपटाला नाव देण्यात आले आहे.
१२ डिसेंबर २०२५ ला शोले पुन्हा प्रदर्शित होणार
रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले पुढील महिन्यात १२ डिसेंबर २०२५ रोजी देशातील तब्बल १५०० स्क्रीनवर रि-रिलीज करण्यात येणार आहे. आतापर्यंत या चित्रपटाच्या ओरिजनल क्लायमॅक्सची अनेक वेळा चर्चा झाली आहे मात्र आता तो क्लायमॅक्स प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ज्यामुळे बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

शोलेचा मूळ क्लायमॅक्स काय होता?
फिल्म हेरिटेज फाउंडेशनने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती शेअर केली. फिल्म हेरिटेज फाउंडेशनने “शोले” चे 4K रिस्टोअरिंग पूर्ण केले. मूळ क्लायमॅक्समध्ये, ठाकूर गब्बर सिंगला पायांनी चिरडून मारतो. मात्र तेव्हा सेन्सॉर बोर्डाने रिलीज होण्यापूर्वी क्लायमॅक्समध्ये बदल केला. ५० वर्षांनंतर मूळ क्लायमॅक्ससह चित्रपट प्रदर्शित करणे ही टीमसाठी एक उल्लेखनीय कामगिरी आहे. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेला रमेश सिप्पी यांचा “शोले” हा चित्रपट अजूनही भारतीय चित्रपटसृष्टीतील महान चित्रपटांपैकी एक मानला जातो. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, अमजद खान, संजीव कुमार आणि इतर कलाकार या चित्रपटाचा भाग होते.
शोले हा चित्रपटसृष्टीतला कल्ट क्लासिक
शोले हा भारतीय चित्रपटसृष्टीतला असा चित्रपट आहे ज्याकडे कल्ट क्लासिक म्हणून पाहिलं जातं. शोलेतले संवाद पाठ करणाऱ्या पिढ्या घडल्या आहेत. शोले नसांमध्ये भिनलेला प्रेक्षकही सिनेमागृहांनी पाहिला आहे. खरंतर चित्रपटात हिंसा आहे, त्याचा शेवट चांगला नाही म्हणून समीक्षकांनी सुरुवातीला हा चित्रपट आपल्या लेखणीने धोपटला होता. मात्र सलीम जावेद यांनी आणि जी.पी. सिप्पी यांनी एक निर्णय घेतला आणि सिनेमाचा शेवट बदलला. ज्यामुळे चित्रपट प्रचंड चालला. शोले पाहिला नाही असा भारतातला माणूस सापडणं आजही विरळाच आहे इतकी या चित्रपटाची जादू आजही भारतीय प्रेक्षकाच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. १५ ऑगस्ट १९७५ ही या चित्रपटाची रिलिज डेट. चित्रपटाचं नाणं जितकं खणखणीत वाजतं आहे तितकंच या चित्रपटावरचं प्रेम वाढतं आहे. शोलेने मागची पाच दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. शोले म्हणजे असा सिनेमा आहे ज्यात ड्रामा, कॉमेडी, अॅक्शन सगळं आहे.
