समीर जावळे

Sholey Coin : शोलेमधला ट्रेनमधला आठवतोय? जय आणि विरुला ठाकूरने बांधलंय, गब्बरचे डाकू ट्रेनवर हल्ला करतात. जय-विरु त्यांच्याशी लढतात. पण पोलीस इन्स्पेक्टर बलदेव ठाकूर गोळी बेशुद्ध होतो. त्यावेळचा जय विरुचा संवाद आठवा. विरु म्हणतो, ” क्या करे? भाग तो सकते हैं.. अगर हम भाग गये तो ये मर जायेगा. अगर इसे अस्पताल ले गये तो जेल जाना होगा. क्या बोलता है.. तू बोल, निकाल वहीं..” मग जय खिशातून कॉईन काढतो आणि म्हणतो; ‘हेड्स अस्पताल चलते हैं, टेल्स भाग चलते हैं, हेड्स!” हेड्स ज्या कॉईनवर येतो तो कॉईन म्हणजेच ते खास नाणं जयकडे (अमिताभ बच्चन) असतं. अख्ख्या सिनेमात जितक्या वेळा पैज लागते अमिताभ जिंकतो. कारण हे असं नाणं असतं ज्याच्या दोन्ही बाजू सारख्याच असतात.

शोले चित्रपटातलं नाणं लाँच

शोलेमधल्या या नाण्याची आठवण येण्याचं खास कारण म्हणजे शोलेची पन्नाशी. होय या वर्षी १५ ऑगस्टला शोले प्रदर्शित होऊन ५० वर्षे पूर्ण होत आहेत. शोलेच्या पन्नाशीचा हा उत्सव वर्षभर साजरा होणार आहे, त्याच निमित्ताने शोलेतलं हे खास नाणं प्रकाशित केलं आहे. हे तेच नाणं आहे जे सिनेमातल्या जयकडे असतं. जयला गोळी लागते आणि मग विरुला ते नाणं मिळतं. तेव्हा त्याला कळतं हे असं नाणं आहे ज्याच्या दोन्ही बाजू एकच आहेत. पहिल्यांदा सिनेमा पाहताना हा सीन पाहून आपणही चक्रावूनच जातो. पण जय आणि विरु यांच्या दोस्तीइतकंच ते नाणंही आपल्या लक्षात राहतं.

सलीम जावेद यांची अल्टिमेट स्क्रिप्ट

सलीम जावेद यांची जबरदस्त स्क्रिप्ट, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, संजीव कुमार, हेमा मालिनी, जया भादुरी, अमजद खान, जगदीप, असरानी, सत्येन कपूर, मॅक मोहन, विजू खोटे, ए के हंगल यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांची फौज या चित्रपटात होतीच. गब्बर (अमजद खान), ठाकूर (संजीव कुमार), जय (अमिताभ बच्चन), विरु (धर्मेंद्र), बसंती (हेमा मालिनी) राधा (जया भादुरी) यांच्या भोवती हा चित्रपट फिरतो. या सगळ्यांच्या भूमिका जितक्या खास आहेत तितकंच महत्त्व या खास नाण्याचं आहे.

Sholay
शोले (फोटो सौजन्य: द इंडियन एक्सप्रेस)

शोले हा चित्रपटसृष्टीतला कल्ट क्लासिक

शोले हा भारतीय चित्रपटसृष्टीतला असा चित्रपट आहे ज्याकडे कल्ट क्लासिक म्हणून पाहिलं जातं. शोलेतले संवाद पाठ करणाऱ्या पिढ्या घडल्या आहेत. शोले नसांमध्ये भिनलेला प्रेक्षकही सिनेमागृहांनी पाहिला आहे. खरंतर चित्रपटात हिंसा आहे, त्याचा शेवट चांगला नाही म्हणून समीक्षकांनी सुरुवातीला हा चित्रपट आपल्या लेखणीने धोपटला होता. मात्र सलीम जावेद यांनी आणि जी.पी. सिप्पी यांनी एक निर्णय घेतला आणि सिनेमाचा शेवट बदलला. ज्यामुळे चित्रपट प्रचंड चालला. शोले पाहिला नाही असा भारतातला माणूस सापडणं आजही विरळाच आहे इतकी या चित्रपटाची जादू आजही भारतीय प्रेक्षकाच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. १५ ऑगस्ट १९७५ ही या चित्रपटाची रिलिज डेट. चित्रपटाचं नाणं जितकं खणखणीत वाजतं आहे तितकंच या चित्रपटावरचं प्रेम वाढतं आहे. शोलेने मागची पाच दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. शोले म्हणजे असा सिनेमा आहे ज्यात ड्रामा, कॉमेडी, अॅक्शन सगळं आहे.

शोलेतल्या प्रत्येक पात्राचा अभ्यास करुन भूमिका साकारल्या गेल्या आहेत

जी.पी. सिप्पींचं दिग्दर्शन, आर. डी. बर्मन यांचं संगीत, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, संजीव कुमार, अमजद खान यांच्यासारखे दिग्गज कलाकार आणि त्यांना सहकलाकारांनी दिलेली साथ यामुळे शोलेची भट्टी जी जमून आली आहे त्याला जवाब नाही. ‘शोले’तल्या प्रत्येक कॅरेक्टरवर विशेष अभ्यास करुन ते सिनेमात समाविष्ट करण्यात आलं होतं. त्यामुळेच आपल्याला ठाकूर, जय, विरु, बसंती, राधा यांच्या प्रमाणेच जेलर, हरिराम नाई, कालिया, सांबा असे सगळेच लक्षात राहतात. ‘शोले’ अॅमेझॉनवरही प्रदर्शित झाला आहे. तसंच मल्टिप्लेक्स नसताना चित्रपट पुन्हा पुन्हा लागत असत. त्यात शोले जर कुणी आणला तर सिंगल स्क्रिन चालवणाऱ्यांची चांदी असे. अगदी ९० च्या दशकापर्यंत हे सगळं होतंच. आता तर शोले पाहण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. शिवाय या चित्रपटाच्या सुरस कथाही सगळ्यांना पाठ झाल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शोले नावाच्या नाण्याचा खणखणाट आजही कायम

सेव्हन समुराई, वन्स अपॉन टाइम इन द वेस्ट आणि द गुड, द बॅड अँड अग्ली या तीन चित्रपटांवर शोलेची कथा बेतलेली आहे. यातल्या एका चित्रपटातही नाण्याचा सीन आहेच. शिवाय या नाण्याचा खास किस्सा सांगता येईल तो मुंबईतल्या मिनर्व्हा या थिएटरचा. डॉल्बी साऊंड इफेक्टमध्ये ‘शोले’ या ठिकाणी प्रदर्शित झाला होता आणि सीटच्या खाली साऊंड होते. शोलेतला प्रत्येक संवाद आणि या नाण्याचा खणखणाट ऐकण्यासाठी प्रेक्षक मिनर्व्हात गर्दी करायचे. हा चित्रपट या थिएटरमध्ये पाच वर्षे होता. नाण्याचा खणखणाट त्यापुढेही अनेक वर्षे वाजत राहिलाच, वाजतच राहिल यात शंका नाही.