२ ऑक्टोबरचा आजचा दिवस विजयादशमीचा दिवस आहे. रामाने रावणाचा वध केला तो आजच्याच दिवशी, वाईट शक्तींवर चांगल्या शक्तीने विजय मिळवला म्हणून विजयादशमी साजरी केली जाते. आज याच निमित्ताने सिमी गरेवाल यांनी रावणाला पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी तुला उगाच जाळलं जातं रे रावणा वगैरे म्हटलं आहे. रावणाने साधूच्या वेशात येऊन सीतेचं अपहरण केलं. त्यानंतर तिला लंकेला पळवून नेलं हे आपल्याला माहीत आहेच. शिवाय त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी लंकेला जाऊन रावणाचा वध केला आणि सीतेची सुटका केली हे देखील आपल्याला माहीत आहे. मात्र या सगळ्यावर रावणाविषयी कळवळा दाखवत सिमी गरेवाल यांनी पोस्ट लिहिली आहे. त्यांच्या पोस्टवर विविध प्रतिक्रियाही येत आहेत.

काय आहे सिमी गरेवाल यांचं पत्र?

प्रिय रावणा, तू घाईगबडीत एका महिलेचं अपहरण केलं. त्यानंतर तिला इतका सन्मान दिलास जेवढा आजही लोक महिलांना देत नाहीत. तू तिला चांगलं जेवण दिलंस, तिची रक्षा करण्यासाठी तिला महिला सुरक्षा रक्षक दिल्यास. तू तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवलास. पण ती नाही म्हणाली. ज्यानंतर तू तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकलं नाहीस. भगवान रामाने तुला मारलं पण तू त्यानंतर माफी मागितली. मला वाटतं संसदेत जे लोक बसतात त्यातल्या अर्ध्या लोकांपेक्षा तू जास्त शिकलेला होतास. माझ्यावर विश्वास ठेव तुला जाळण्याबाबत माझ्या मनात कुठलंही हार्ड फिलिंग नाही.

सिमी गरेवाल यांच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया

सिमी गरेवाल यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण या पोस्टला क्रिएटिव्ह पोस्ट म्हणत आहेत. तर काही लोक म्हणत आहेत रंभा आणि वेदवती यांच्यासह रावणाने केलेले गैरव्यवहार, गैरवर्तन तुम्ही विसरलात का? तुमचं कुणी अपहरण केलं तर तुम्ही ते सुद्धा हसण्यावारी न्याल का? असंही काही युजर्नसी विचारलं आहे. दसऱ्याच्या निमित्ताने सिमी गरेवाल यांनी केलेलं ट्वीट चांगलंच चर्चेत आलं आहे. दीपिका भारद्वाज नावाच्या एका युजरने सिमी यांना उत्तर दिलं आहे. ज्या क्षणी रावण तुमचं अपहरण करेल ना तुमचा हा सगळा रोमान्स संपून जाईल. तुम्ही त्याच्या विरोधात पोलिसात जाल त्यावेळी पोलीस तुम्हाला म्हणतील की बहिणी तुला फक्त पळवलंच तर आहे, तो तुझ्याशी लग्न करु इच्छितो मग तुम्ही म्हणाल का की हार्ड फिलिंग नाहीत? रोहिणी नावाची एक युजर म्हणते तुम्ही जर रामायण वाचलं असेल तर तुम्हाला कळेल की रावणाची कृती ही काही खोडकरपणा नव्हता. सीतेच्या आधी कुबेराच्या पत्नीसह त्याने केलेलं दुष्कर्म तुम्ही विसरलात का? अंशुल पांडे या युजरने म्हटलं आहे की रावण बलात्कारी होता हे वाल्मिकी रामायणात म्हटलं आहे. त्याने त्याच्या सुनेवर बलात्कार केला होता. तरीही तुम्हाला काहीच हार्ड फिलिंग नाहीत का? अशा प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर उमटत आहेत.