दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची बहीण श्वेता सिंह किर्ती यांनी अभिनेत्याच्या मृत्यूवरून पुन्हा नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. पत्रकार शुभंकर मिश्रा यांना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी काही मोठे खुलासे केले आहेत. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, सुशांतच्या मृत्यूच्या काही महिने आधी एका सायकिक (psychic) म्हणजेच समोरच्या व्यक्तीच्या मनात काय सुरू आहे, किंवा भविष्यात काय होणार याबद्दल दावा करणारी व्यक्ती, त्यांच्या कुटुंबाला इशारा दिला होता की, ” तो मार्च २०२० नंतर वाचणार नाही.”
श्वेता यांनी त्यांच्या भावाच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर एका सायकिक सेशनदरम्यान त्यांना सांगण्यात आलेल्या धक्कादायक प्रकाराबद्दलची आठवण सांगितली. त्यांच्या मते त्या सायकिकने खुलासा केला होता की, सुशांतला भावनात्मक दृष्ट्या खचवण्यासाठी कोणालातरी त्याच्या आयुष्यात पेरण्यात आले होते. त्या म्हणाल्या की, “काय कारण असेल ते असो भाई (सुशांत) खूप वेगाने पुढे जात होता, मला माहीत नाही. बॉलिवूड इंडस्ट्री कशी आहे, काय आहे, पण त्यांना वाटलं तेच मला सायकिकने सांगितलं होतं. त्यामुळे कोणालातरी त्याच्या आयुष्यात पेरण्यात आले जेणेकरून त्याला मानसिक खचवता येईल.”
दिवंगत अभिनेता सुशांत सिंहची बहीण पुढे म्हणाली की, त्यांच्या मोठ्या बहिणीला एकदा सुशांत हा काळ्या जादूच्या प्रभावाखाली असल्याबद्दल इशारा देणारा एक फोन कॉल आला होता. “तुम्हाला माहितेय, एक कॉल देखील आला होता, ज्यामध्ये माझ्या दीदीला सांगितलं गेलं की तो मार्चनंतर वाचणार नाही कारण त्याच्यावर काळी जादू केली जात आहे. पण तुम्हाला माहितेय, आम्ही खूप शिकलेल्या आणि सुसंस्कृत कुटुंबातील आहोत. त्यामुळे आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही.”
श्वेता म्हणाल्या की, त्यांच्या कुटुंबाने त्या वेळी अंधश्रद्धा म्हणून ते दावे फेटाळून लावले होते. पण ही दुर्घटनेची घटना घडल्यानंतर, त्या वेगळ्या दृष्टिकोनातून या गोष्टींवर पुन्हा विचार करू लागल्या.
याच मुलाखतीत श्वेता यांनी रिया चक्रवर्ती हिच्याबद्दलही भाष्य केले. रिया सुशांतच्या मृत्यूपूर्वी त्याच्याबरोब रिलेशनशिपमध्ये होती. रियाने केलेल्या एका इन्स्टाग्राम पोस्टचाही श्वेता यांनी उल्लेख केला, जी त्यांना विचित्र वाटली होती.
“तिने इंस्टाग्रामवर एका फोटोबरोर एक खूप विचित्र कविता लिहिली होती आणि भाईनेही (सुशांतने) ती कविता लाइक केली होती. त्यांच्या इन्स्टाग्राम फीडवर ती होती, ज्यात ती म्हणाली होती की, ‘तू खूप उंच भरारी घेत आहेस आणि तुझे पंख कापण्याची गरज आहे (You are soaring too high and your wings need to be cut)’ती खूप विचित्र कविता होती. मला वाटते ती आजही तिच्या इन्स्टाग्रामवर असेल. आणि मला असं वाटलं की, का? हे असं का?” असे त्या म्हणाल्या.
श्वेता यांच्या मते, ही पोस्ट मागे वळून पाहताना अस्वस्थ करणारी वाटते. त्यांनी असेही सांगितले की सायकिकशी बोलल्यानंतर त्यांनी पुन्हा जाऊन रियाचे इन्स्टाग्राम पाहिले आणि ती कविता पुन्हा वाचली, ज्यामुळे त्या आणखिनच अस्वस्थ झाल्या.
श्वेता म्हणाल्या, “भाईच्या (सुशांतच्या) मृत्यूनंतर मी खरोखरच जाऊन तपासले, की हे खरंच हे सत्य आहे का. कारण सायकिकने मला सर्व काही सांगितले होते. तेव्हा अशा प्रकारची कविता लिहिलेली आढळली, आणि त्याच वेळी ती भाईच्या आयुष्यात होती.”
जून २०२० मध्ये झालेल्या सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यू हा आत्महत्या असल्याचे तपास यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. तरीही अनेकांकडून त्याबद्दल शंका व्यक्त केली जाते.
१४ जून २०२० रोजी ३४ वर्षीय सुशांत त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. या घटनेने मोठा वाद निर्माण झाला होता. नंतर सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी बिहार पोलीस करत होते, कारण सुशांतच्या वडिलांनी पाटणा येथे रियाने त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली होती.
सीबीआयच्या अहवालात असेही म्हटले आहे की, ८ जून २०२० पासून सुशांतने आत्महत्या केली त्या दिवसापर्यंत रिया किंवा तिचा भाऊ शोविक त्याच्या घरी उपस्थित नव्हते. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी रिया आणि शोविकला आरोपी करण्यात आले होते. तपासात असे दिसून आले की, सुशांत १० जून रोजी व्हॉट्सअॅपवर शोविकशी बोलला होता, परंतु त्या दिवशी तो रियाशी बोलला नव्हता.
