बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया ३५ वर्षांची आहे, पण तिची त्वचा खूप तजेलदार आहे. त्याचबरोबर ती खूप फिट आहे. चित्रपटांमधील भूमिकेच्या मागणीनुसार तमन्ना तिचं वजन वाढवते, तसेच कमी करते. फिटनेस फ्रिक तमन्ना भाटियाची दैनंदिन दिनचर्या कशी आहे, ते जाणून घेऊयात.
तमन्ना भाटियाने तिच्या ट्रेनरशी गप्पा मारताना तिची रोजची दिनचर्या कशी असते, ते सांगितलं. तमन्नाला पहाटे लवकर उठण्याची सवय आहे. “मी पहाटे ४ वाजता उठते आणि ४.३० वाजता ट्रेनिंगासाठी पोहोचते,” असं तमन्ना म्हणाली. पहाटे उठल्यानंतर तमन्ना परत झोपत नाही, तर आठ ते १२ तास काम करते. “नाही, मी दिवसा झोपत नाही. अजिबात नाही. मी संपूर्ण दिवस काम करते. किती तास…ते कामावर अवलंबून आहे. ते ८ तास असू शकतं किंवा १२ तास असू शकतं,” असं ३५ वर्षीय तमन्ना म्हणाली.
तमन्ना भाटियाला वर्कआउट करायला आवडतं
सकाळी लवकर उठणं चांगलं आहे, असं मत तमन्नाने व्यक्त केलं. तसेच तमन्ना तिच्या ट्रेनरला १०-१२ वर्षांपासून ओळखते. “तंदुरुस्त राहण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. अर्थातच, डाएटवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. पण वर्कआउट्सशिवाय दुसरा पर्याय नाही. तुम्हाला ट्रेनिंग घ्यावीच लागली. मला वर्कआउट करायला आवडतं,” असं तमन्ना भाटियाने नमूद केलं.
तज्ज्ञ तमन्नाच्या सवयीबद्दल काय सांगतात?
तमन्ना भाटियाप्रमाणे पहाटे ४ वाजता उठून व्यायाम केल्याने एनर्जी मिळते, असं आहारतज्ज्ञ आणि सर्टिफाइड डायबेटिस एज्युकेटर कनिका मल्होत्रा म्हणाल्या. “सूर्योदयापूर्वी दिवसाची सुरुवात केल्याने एक वेगळंच समाधान मिळतं. सकारात्मकतेने दिवसाची सुरुवात होते. पहाटे व्यायाम केल्याने कामात लक्ष केंद्रित होण्यास मदत होते, ऊर्जा मिळते आणि रात्री चांगली झोप येते. व्यायामानंतर झोप न घेतल्याने शरीर आतून स्थिर राहतं, त्यामुळे रात्री शांत झोप लागते,” असं कनिका म्हणाल्या.
रात्री पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे. सात ते नऊ तास जे झोपतात, त्यांच्यासाठी ही दिनचर्या खूप आरोग्यदायी आहे. “अशा शिस्तबद्ध दिनचर्येचे पालन केल्याने, विश्रांती घेतल्याने मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य दोन्ही चांगले राहते, त्याुमळे प्रत्येक दिवस फ्रेश वाटतो,” असं कनिका मल्होत्राने नमूद केलं.
तज्ज्ञांच्या मते, लवकर उठणाऱ्या लोकांची पचनसंस्था चांगली राहते. लवकर उठल्याने त्यांच्या आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि पोट फुगण्याचा त्रास कमी होतो, असं कनिका म्हणाल्या. तसेच दुपारी झोप न घेतल्याने रात्री चांगली झोप लागते व आतड्यांचे आरोग्य सुधारते, असंही त्यांनी सांगितलं.