The Bengal Files : ‘द बंगाल फाईल्स’ हा विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित चित्रपट येत्या ५ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. फाळणीनंतर बंगालमध्ये काय घडलं? यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दरम्यान विवेक अग्निहोत्री यांनी आधी दिग्दर्शित केलेल्या द कश्मीर फाईल्स आणि द ताश्कंत फाईल्स या चित्रपटांवरुन जसा वाद निर्माण झाला होता असाच एक वाद या चित्रपटावरुनही निर्माण झाला आहे. या चित्रपटाचं आधीचं नाव द दिल्ली फाईल्स असं होतं जे बदलून ‘द बंगाल फाईल्स’ करण्यात आलं. या चित्रपटावरुन काय वाद निर्माण झाला आहे? आपण जाणून घेऊ.
काय आहे चित्रपटाचा वाद?
‘द बंगाल फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी एका रीलमध्ये गोपाल मुखर्जींबाबत “एक था कसाई गोपाल पाठा” असा उल्लेख केला. त्यानंतर त्यांचे नातू शांतनु मुखर्जी यांनी या वाक्याचा निषेध नोंदवला. माझ्या आजोबांना विवेक अग्निहोत्री कसाई कसं काय म्हणू शकतात? ही बाब अपमानास्पद आहे, मला वाटतं की विवेक अग्निहोत्रींनी आणखी अभ्यास करायला हवा होता. त्यांना ही चुकीची माहिती कुठून मिळाली? त्यांनी याबाबत आमच्याकडे शहानिशा का केली नाही? असे प्रश्न उपस्थित झाले आणि इथूनच या चित्रपटाच्या वादाची सुरुवात झाली. तसंच आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे त्यांच्याविरोधात आम्ही एफआयआरही दाखल करत आहोत असंही शांतनु मुखर्जींनी म्हटलं आहे. तसंच आमचा या चित्रपटाला विरोध कायम राहिल असंही मुखर्जी यांनी म्हटलं आहे. शांतनु म्हणाले माझे आजोबा गोपाल मुखर्जी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय होते, त्यांच्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांचा उल्लेख कुणीही कसाई म्हणून कसा काय करु शकतो? गोपाल मुखर्जी यांचं चारित्र्यहनन केल्याबद्दल विवेक अग्निहोत्री यांनी माफी मागावी अशी मागणी शांतनु यांनी केली आहे. तसंच चित्रपटात त्यांच्याविषयीचं वास्तव मोडतोड करुन दाखवण्यात आल्याबद्दलही माफी मागितली गेली पाहिजे असंही शांतनु मुखर्जींनी म्हटलं आहे.
१६ ऑगस्टला नेमकं काय घडलं?
या वादानंतर कोलकाता या ठिकाणी चित्रपटाच्या ट्रेलरचं लाँच होतं. मात्र कथित राजकीय दबावामुळे ट्रेलरचं लाँच रद्द करण्यात आलं. त्यावेळी विवेक अग्निहोत्री यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. ते म्हणाले, मला सांगण्यात आलं आहे की जिथे ट्रेलर लाँच आहे त्या ठिकाणी सगळ्या वायर्स कापण्यात आल्या आहेत. हे हुकूम कोण देतं आहे मला माहीत नाही. माझ्या विरोधात तक्रारही दाखल झाली आहे. एका खासगी हॉटेलमध्ये आम्ही ट्रेलर लाँचचा कार्यक्रम ठेवला आहे त्याला विरोध कसा काय होतो? याला हुकूमशाही नाही म्हणायचं तर मग काय म्हणायचं? असा प्रश्न विवेक अग्निहोत्री यांनी विचारला आहे. द बंगाल फाईल्स या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, मोहन कपूर, दिव्येंदू भट्टाचार्य, पल्लवी जोशी, सास्वत चटर्जी, पुनित इस्सर यांच्यासह अनेक कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
सास्वत चटर्जी वादाबाबत काय म्हणाले?
बंगाल फाईल्स या चित्रपटात सास्वत चटर्जी यांचीही भूमिका आहे. ते म्हणाले स्वातंत्र्य सैनिक गोपाल मुखर्जी यांच्यावरुन बराच वाद निर्माण झाला आहे. १९४६ मध्ये जे दंगे उसळले होते त्यात हिंदूंवर झालेले अत्याचार रोखण्यात गोपाल मुखर्जी यांची महत्त्वाची भूमिका होती. हे सगळं असलं तरीही मी एक अबिनेता आहे. मला ते पात्र आवडलं आणि मी ती भूमिका साकारली. मी काही इतिहासकार नाही. मला याच्याशी काही करायचं नाही की इतिहास काय म्हटलं होतं? ते माझं काम नाही. ज्यांना वाटतं आहे की बंगालचा इतिहास चुकीचा सांगितला जातो आहे तर वास्तव काय आहे ते मांडून त्यांनी थेट कोर्टात जावं. उगाच वादंग निर्माण करुन काही होणार नाही.