scorecardresearch

“त्याची विकृत मानसिकता…”; फोन नंबर लीक करण्याच्या धमकीवर ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माने सोडले मौन, म्हणाली…

‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माला सोशल मीडियावर मिळाली होती धमकी

the-kerala-story
'द केरला स्टोरी' चित्रपट अभिनेत्री अदा शर्मा

‘द केरला स्टोरी’ चित्रपटामुळे अभिनेत्री अदा शर्मा सध्या चांगलीच चर्चेत आहे. ‘द केरला स्टोरी’ चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित झाल्यावर पुढे अवघ्या १८ दिवसांमध्ये या चित्रपटाने २०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली. अभिनेत्री अदा शर्मासाठी हा चित्रपट तिच्या करिअरमधील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला, मात्र अलीकडेच घडलेल्या एका घटनेमुळे अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

अदा शर्मा एकीकडे ‘द केरला स्टोरी’चे यश साजरे करत असतानाच दुसरीकडे तिला सोशल मीडियावर वेगवेगळ्या धमक्या येत आहेत. एका इन्स्टाग्राम यूजरने अदा शर्माच्या फोन क्रमांकाचे तपशील लीक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एवढेच नाही तर या यूजरने एक पोस्ट व्हायरल करीत अदाला फोन नंबर लीक करायची धमकीसुद्धा दिली होती. या धमकीवर अदाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा- ‘केनडी’ चित्रपट बनवल्यानंतर अनुराग कश्यप झाला गरीब; व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

अदा म्हणाली, “मलाही त्या मुलींसारखं वाटत आहे ज्यांचे एडिट केलेले फोटो आणि नंबर लीक होतात. हे अशा व्यक्तीची विकृत मानसिकता दर्शवते जी इतक्या खालच्या पातळीवर घसरू शकते आणि जिला हे सगळं करण्यात आनंद मिळतो. ही घटना मला ‘द केरला स्टोरी’मधील एका दृश्याची आठवण करून देते, जिथे एका मुलीला तिचा नंबर लीक करून धमकी दिली जाते.”

पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यावर, अदा शर्माला फोन नंबर लीक करण्याची धमकी देणाऱ्या इन्स्टाग्राम यूजरने तात्काळ पोस्ट डिलीट करीत त्याचे अकाउंट बंद केले. अकाउंट बंद केल्यावरसुद्धा यूजरने केलेली पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्या पोलीस संबंधित यूजरचा आणि या संपूर्ण घटनेचा तपास करीत आहेत.

हेही वाचा- “तो सगळ्यांशी खूप..”; कॅमेऱ्याच्या मागे सलमान खानची वागणूक नेमकी कशी असते? कंगना रणौतचं मोठं वक्तव्य, म्हणाली,…

‘द केरला स्टोरी’ चित्रपटात हिंदू मुलींना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडून नंतर दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील करण्याचा कट रचला गेला, असा दावा दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडून करण्यात आला आहे. चित्रपटाच्या या कथानकामुळे दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. आतापर्यंत या चित्रपटातील बहुतांश कलाकारांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-05-2023 at 12:42 IST

संबंधित बातम्या