‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. ५ मे रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने अवघ्या १० दिवसांमध्ये १२५ कोटींचा गल्ला जमवला आहे. यामध्ये अभिनेत्री अदा शर्माने मुख्य भूमिका साकारली असून तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. ‘द केरला स्टोरी’ला प्रेक्षकांचा मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून अदा शर्माने नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : “सेटवर सोडतोस का?” अनोळखी व्यक्तीबरोबर ‘बिग बीं’ची बाईक राईड, नेटकरी म्हणतात…

‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून तुला काय वाटते? असा प्रश्न केल्यावर अदा शर्माने ‘एएनआय’शी बोलताना सांगितले की, “चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून मी खूप आनंदी आहे. मी कोणताही चित्रपट करताना हा माझा शेवटचा चित्रपट आहे असा विचार करते कारण पुन्हा कधी संधी मिळेल की नाही?, माझ्या कामावर कोणी विश्वास दाखवेल की नाही? याबाबत मला माहिती नसते.”

हेही वाचा : पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडबद्दल बोलताना उर्फी जावेदचा संताप, शिवीगाळ करत सांगितला ‘तो’ प्रसंग

अदा शर्मा पुढे म्हणाली, “मला प्रेक्षकांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल याची अपेक्षा नव्हती. मी त्यांची खूप आभारी आहे. माझी स्वप्न ही कायम छोटी होती. जसे की, हत्ती आणि कुत्र्यासोबत खेळणे वगैरै…अर्थात मी नेहमीच चांगली भूमिका मिळेल याची स्वप्न पाहिली आहेत.” नेपोटीजमबाबत विचारले असता, बॉलीवूडमध्ये कोणतीही पार्श्वभूमी नसताना एखाद्या अभिनेत्रीला एवढे प्रेम मिळेल याची कल्पना नव्हती, परंतु लोक एवढ्या मोठ्या संख्येने माझा चित्रपट पाहण्यासाठी जात आहेत, हे पाहून खूप आनंद होत असल्याचे अदाने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मुलींमध्ये जागरुकता निर्माण व्हावी या हेतूने हा चित्रपट बनवला होता त्यामुळे आज एवढे लोक चित्रपटगृहांमध्ये जाऊन ‘द केरला स्टोरी’ पाहत आहेत याचा मला आनंद आहे. चित्रपटामुळे इतक्या वर्षांपासून लपवले गेलेले सत्य लोकांसमोर आल्याने मी खूश आहे” असे सांगत अदाने समाधान व्यक्त केले.