Prem Chopra Discharge : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्याचं वृत्त समोर येताच त्यांच्या अनेक चाहत्यांना चिंता लागून राहिली होती. धर्मेंद्र यांच्यानंतर अभिनेते प्रेम चोप्रा यांनादेखील रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे या दोन्ही दिग्गज कलाकारांचे चाहते त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करताना दिसले.
उपचारांनंतर आता धर्मेंद्र हे घरी परतले आहेत. त्यांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशातच प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीबाबतही एक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे धर्मेंद्र यांच्यानंतर अभिनेते प्रेम चोप्रा यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर प्रेम चोप्रा यांना ८ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतंय. आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
माध्यमांमधील वृत्तांनुसार, रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की प्रेम चोप्रा यांना आधीपासूनच हृदयासंबंधित त्रास होता आणि यासोबरच त्यांना व्हायरल इन्फेक्शनही झालं होतं. मात्र, आता त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.
प्रेम चोप्रा यांच्या वयानुसार प्रकृतीचा विचार करता, त्यांच्यावर काही दिवस काळजीपूर्वक लक्ष ठेवण्यात आले. कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांनी उपचारांना चांगला प्रतिसाद दिला आणि प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना शनिवारी घरी पाठवण्यात आले.
प्रेम चोप्रा यांना रुग्णालयात दाखल केले गेले, तेव्हा त्यांचे जावई विकास भल्ला यांनी प्रकृतीची माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, “काळजी करण्यासारखे काही नाही; ते नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल.”
दरम्यान, प्रेम चोप्रा यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास, ९० वर्षांच्या प्रेम चोप्रा यांनी सहा दशकांच्या कारकिर्दीत ३८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. दमदार अभिनय आणि हटके डायलॉग्समुळे ते हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय खलनायकांपैकी एक ठरले.
प्रेम नगर’, ‘उपकार’ आणि ‘बॉबी’ सारखे क्लासिक चित्रपट देऊन अभिनेते प्रेम चोप्रा यांनी इंडस्ट्रीमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या प्रकृतीबाबत आलेल्या वृत्तांनंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. पण आता प्रेम चोप्रा यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
