‘रॉ’पटांची एक वेगळीच दुनिया हिंदी चित्रपटांनी वसवली आहे. जो तो उठतो आणि वेगवेगळ्या काळातील गुप्तहेरांच्या गोष्टी हिंदी चित्रपटातून रंगवून सांगतो. एका अर्थी हाच एक वेगळा चित्रपटांचा प्रकार म्हणून बॉलीवूडने दृढ केला आहे. त्यातही बॉलीवूडजनांमध्ये हुशार असलेल्या यशराज प्रॉडक्शनने या गुप्तहेर आधारित संकल्पनांना एकत्र करत नवीन चित्रपट श्रृंखला सुरू केली. त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने २०१९ साली प्रदर्शित झालेल्या ‘वॉर’ या चित्रपटाने झाली होती.
हृतिक रोशनने साकारलेला कबीर धालिवाल हा तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनला होता. त्यानंतर या वायआरएफच्या गुप्तहेर विश्वात टायगर, पठान असे कथानायक वाढत राहिले असले तरी कबीरची स्वतंत्र गोष्ट म्हणून ‘वॉर २’ बद्दल उत्सुकता अधिक होती. मात्र, त्याची गोष्ट सांगताना त्याच्यासमोर दाक्षिणात्य अभिनेता ज्युनिअर एनटीआरला उभं केल्याने ॲक्शनचा गुणाकार आणि कथेला रंजक वळणावळणांची फोडणी देण्याच्या नादात एक नवाच खेळखंडोबा उभा राहिला आहे.
‘वॉर २’ पाहताना पहिल्या चित्रपटाचा विचार आवश्यक आहे. कारण, हा चित्रपटच मुळात कबीरची व्यक्तिरेखा आणि तो साकारणारा अभिनेता हृतिक रोशन याच्यामुळे महत्त्वाचा ठरला होता. हृतिक रोशनची ॲक्शनदृश्यांची शैली, सिद्धार्थ आनंदसारख्या ॲक्शनपटासाठी नावाजलेल्या दिग्दर्शकाची मांडणी आणि रंजक कथानक या सगळ्या गोष्टी जमून आल्या आणि ‘वॉर’ यशस्वी ठरला. ‘वॉर २’ करताना दिग्दर्शनाची धुरा अयान मुखर्जीच्या हातात आली. या दोन्ही चित्रपटांची पटकथा श्रीधर राघवन यांनी लिहिली आहे, मात्र पहिल्या चित्रपटाच्या वेळी दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद स्वत:ही पटकथा लेखनात सहभागी होता.
‘वॉर २’च्या बाबतीत ही जबाबदारी अयानने पूर्णत: पटकथा लेखकावर सोपवली आहे. त्यातही दाक्षिणात्य अभिनेता ज्युनिअर एनटीआरची चित्रपटात वर्णी लागली असल्याने एकूणच पटकथा लिहिताना या दोन्ही कलाकारांचं आपापलं वजन आणि लोकप्रियता यांच्यात समतोल साधण्याच्या प्रयत्नात लेखक – दिग्दर्शकाची ऊर्जा अधिक खर्ची पडल्याचं जाणवतं. त्यामुळे हा की तो वरचढ ठरवण्याच्या नादात ॲक्शनचीही मात्रा अधिक झाली आहे आणि त्यासाठी कथेची जी काही तोडफोड करावी लागली आहे त्याला तोड नाही. कबीर धालिवाल आणि त्याचे गुरू कर्नल लुथ्रा यांच्या नात्यापासून चित्रपटाची सुरुवात होते. देशाच्या दृष्टीने कबीर आधीच बदनाम असलेला हेर आहे, प्रत्यक्षात तो सद्गुणांचा पुतळा आहे. पण त्याची माहिती त्याच्या पलीकडे फक्त कर्नल लुथ्रा यांना आहे.
बदनामीचं हे सोंग कबीरने पांघरून घेण्यामागेही कर्नल लुथ्रा यांनी त्याच्यावर सोपवलेलं एक खूप महत्त्वाचं आणि रहस्यमयी असं मिशन आहे. मात्र, या मिशनची कुणकुण देशात लागण्याआधीच कर्नल लुथ्रा यांची हत्या होते आणि संयशित म्हणून पुन्हा एकदा कबीरवरच ठपका येतो. आता या चित्रपटात आणखी एक वळण आहे ते म्हणजे लुथ्रा यांची कन्या काव्या (कियारा अडवाणी). काव्याला तिच्या वडिलांची हत्या करणाऱ्या कबीरला दिसल्या जागी गोळ्या घालून स्वत:चा राग शांत करायचा आहे.
आणि दुसरा आहे मेजर विक्रम (ज्युनिआर एनटीआर) ज्याच्यावर कबीरला पकडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय, कर्नल लुथ्रा यांची जागा आता नव्या कर्नलने म्हणजेच विक्रांत कौल (अनिल कपूर) यांनी घेतली आहे. तर हे तिघंही एका टीमअंतर्गत कबीरला मारण्याची योजना आखतात. आणि या सगळ्यापासून अज्ञात असलेल्या कबीरला स्वत:चा जीवही वाचवायचा आहे, मिशनही पूर्ण करायचं आहे आणि स्वत:चं निर्दोषत्वही सिद्ध करायचं आहे. हे सगळं तो कसं करतो याची अगदी धरपकड शैलीतील कथा ‘वॉर २’मध्ये पाहायला मिळते.
कथा वर सांगितल्याप्रमाणे जरी घडली असती तरी ॲक्शन हा त्यातला मुख्य जीव होता. आणि दुसरं म्हणजे मुख्य नायकाच्या बाजूने पारडं जड आहे, त्यालाच सिद्ध करायचं आहे सगळं… त्यामुळे ते कबीरमय झालं असतं. जे नेमकं इथे दिग्दर्शकाला करता आलेलं नाही. कारण हृतिकबरोबर की त्याच्यासमोर उभा केलेला मेजर विक्रम अर्थात ज्युनिअर एनटीआरही साधारण कलाकार नाही. त्याचा स्वत:चा स्वतंत्र प्रेक्षकवर्ग आहे, त्यांना दुखवून कसं चालेल? या नादात थोडासा कबीर ऊर्फ ‘कबू’चा भूतकाळ, मग कबीरची प्रेमकथा (एका गाण्यापुरतीची) आणि तो ‘बॉर्डर’मध्ये अभिनेता जॅकी श्रॉफच्या तोंडी असलेला शेर आहे, ‘हम ही हम है तो क्या हम है, तुम्ही तुम हो तो क्या तुम हो’ त्या थाटात दोन्ही नायकांचं महात्म्य वाढवण्याच्या नादात कथेत इतकी रंजक वळणं दिली आहेत की स्वत: लेखक – दिग्दर्शकाला विसर पडावा. त्यात ॲक्शन वाढवण्याच्या नादात तोही प्रकार अतिरंजक, क्वचित हास्यास्पदही ठरला आहे.
हृतिक रोशनचं व्यक्तिमत्त्व, त्याची शरीरयष्टी, त्याचं दिसणं-बोलणं सगळ्याच्या चपखल वापरातून कबीर ही व्यक्तिरेखा जन्माला आली आहे, त्यामुळे इथेही त्याने त्याच सहजशैलीत ती पुढे नेली आहे. ज्युनिअर एनटीआरला दिलेली व्यक्तिरेखाच मुळात गोंधळी आहे, त्याने आपल्या पद्धतीने मेजर विक्रम साकारला आहे. पण थोडक्यात नव्या जय – वीरूची जोडी निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न केला आहे तो फार काही उठावदार झालेला नाही. कियारा अडवाणीला काही कामच मिळालेलं नाही आणि अनिल कपूर यांची भूमिका छोटेखानी असली तरी त्यांनी स्वत:ला साजेशी अशी वठवून घेतली आहे आणि पुढेही ते या कथानकाचा भाग राहणार आहेत. बाकी शह-काटशह, पाठलाग, मारधाड सगळ्याची एक रंजक गोधडी विणण्याच्या नादात खरा नायक आणि खरी गंमत काही सापडेना बुवा!
वॉर २
दिग्दर्शक – अयान मुखर्जी कलाकार – हृतिक रोशन, ज्युनिअर एनटीआर, कियारा अडवाणी, अनिल कपूर, आशुतोष राणा, वरुण बडोला.