Satish Kaushik: जेष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचे हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले आहे. ते ६६ वर्षांचे होते. सतीश कौशिक यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते अभिनयासह दिग्दर्शन, लेखन आणि चित्रपटनिर्मिती याक्षेत्रामध्येही कार्यरत होते. अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या निधनाची माहिती दिली.

सतीश कौशिक यांचा जन्म हरियाणामध्ये झाला होता. त्यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेमध्ये प्रवेश मिळवला. चित्रपटांमध्ये काम करण्याआधी त्यांनी रंगभूमी गाजवली. त्यांनी बऱ्याच नाटकांमध्ये काम केले आहे. पुढे १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने भी दो यारो’ या क्लासिक चित्रपटामधून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटामध्ये त्यांच्यासह नसीरुद्दीन शाह, भक्ती बर्वे, नीना गुप्ता असे अनेक गुणी कलाकार होते. ‘जाने भी दो यारो’च्या सेटवर सतीश आणि नीना यांची चांगली मैत्री झाली. पुढे त्याच वर्षी त्यांनी ‘मंडी’ चित्रपटामध्येही एकत्र काम केले.

दरम्यानच्या काळात नीना गुप्ता आणि क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्यामध्ये जवळीक वाढली. पुढे त्या गरोदर राहिल्या. नीना यांनी लग्न न करता बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे त्यांच्यावर सर्व बाजूंनी टिका झाली. आपल्या जवळच्या मैत्रिणीला होणारा त्रास पाहून सतीश यांनी त्यांची मदत करायचे असे ठरवले होते. काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी तेव्हाचे किस्से सांगितले होते. मुलाखतीदरम्यान ते म्हणाले होते, “मी तिला (नीना गुप्ता) बाळाचा वर्ण सावळा असला म्हणून काय झालं, तू सगळ्यांना ते माझं बाळ आहे असं सांग. मग आपण लग्न करु. कोणाला काहीही कळणार नाही.”

आणखी वाचा – दोन वर्षांच्या मुलाला गमावल्यानंतर सतीश कौशिक यांच्यावर कोसळलेला दु:खाचा डोंगर, ५६ व्या वर्षी पुन्हा वडील झाले अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते पुढे म्हणाले होते, “मला तिला एकटं पडू द्यायचं नव्हतं. मित्र म्हणून मला तिची काळजी वाटत होती. अडचणीत असताना मित्रच मदतीला येतात ना? तिला लग्नाची मागणी घालताना माझ्या मनात अनेक समिश्र भाव होते. तिला धीर देताना ‘मी आहे ना, चिंता कशाला करतेस’ हे तिला सांगितले होते.” या एकूण प्रकरणाबाबत खूप वर्षांनंतर सतीश कौशिक यांनी खुलासा केला होता. ‘सच कहूं तो’ या आत्मचरित्रामध्ये त्यांच्या या प्रसंगाबाबत लिहिले होते.