एके काळची मिस इंडिया असलेली आणि एक उत्तम अभिनेत्री म्हणून परिचित असलेली जूही चावला ८० आणि ९० च्या दशकातली एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आता ती सिनेमांमध्ये फारशी दिसत नाही तरीही एक काळ तिचा होता यात शंका नाही. आमिर खान आणि जूही यांची जोडी पडद्यावर खूपच सुंदर दिसायची. ‘कयामत से कयामत तक’ हा सिनेमा आला आणि जूही घराघरांत पोहचली. खरंतर जूहीचा पहिला सिनेमा ‘सल्तनत’ होता. बिग बजेट सिनेमा असूनही हा सिनेमा चालला नाही. त्यामुळे जूहीने टीव्हीकडे वळायचं ठरवलं होतं. मात्र ते घडलं नाही. एवढंच काय परफेक्शनिस्ट आमिर खान आणि जूही एकमेकांशी जवळपास पाच वर्षांहून अधिक काळ बोलत नव्हते. आज जूहीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊ असेच तिच्याविषयी माहीत नसलेले किस्से.

मिस इंडियाचा फॉर्म सहज भरला आणि..

जूहीचा जन्म १३ नोव्हेंबर १९६७ ला हरयाणातल्या अंबालामध्ये झाला. तिचे वडील IRS होते. तर तिची आईही खासगी नोकरी करत होती. जूही चावलाचं शिक्षण मुंबईतल्या सिडनहॅम महाविद्यालयात झालं आहे. या महाविद्यालयात शिकत असताना एक दिवस मिस इंडिया स्पर्धेचा फॉर्म तिने गंमत म्हणून भरला. मैत्रिणी फॉर्म भरत आहेत चला आपणही हा फॉर्म भरु असं तिला वाटलं होतं. पण तिची निवड मिस इंडिया म्हणून झाली. त्यानंतर तिचं आयुष्यच बदलून गेलं. कारण १९८४ मध्ये जेव्हा तिने ही स्पर्धा जिंकली त्यानंतर लगेचच तिला चित्रपट मिळाला. सल्तनत हा जूहीचा पहिला सिनेमा. १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमात धर्मेंद्र, हेमामालिनी, सनी देओल, श्रीदेवी असे तगडे कलाकार होते. मात्र चित्रपट बॉक्स ऑफिसवर पडला. त्यानंतर जूहीने टीव्ही मालिकांकडे वळायचं ठरवलं होतं, तिला एक खूप चांगली ऑफरही आली होती.

Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’
Rohit Sharma Shared Heart Wrenching Story of Daughter's Birth
लेकीच्या जन्मावेळी रोहित शर्मा पोहोचू शकला नाही, ‘हे’ दोन खेळाडू ठरले कारण; ५ वर्षांनी सांगितला मोठा प्रसंग
Shukra Guru Yuti
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
Juhi Chawla Birth Day
जूही मिस इंडिया झाली तो क्षण (फोटो-फेसबुक )

तर महाभारतात द्रौपदी म्हणून दिसली असती जूही

सल्तनत चालला नाही, तरीही जूही मॉडेलिंग करत होती. तिचे काही फोटो ‘कयामत से कयामत तक’ चे लेखक नासिर हुसैन यांनी जूही चावलाचे काही फोटो पाहिले होते. त्यांनी तिला चित्रपट करण्यासाठी विचारलं होतं. तो चित्रपट होता ‘कयामत से कयामत तक.’ तो चित्रपट जूहीने स्वीकारला. तसंच जूही चावलाचे कुटुंबीय आणि बी. आर. चोप्रा यांची ओळख होती. बी. आर. चोप्रा तेव्हा महाभारत ही मालिका करणार होते. त्यांनी जूहीला भेटायला बोलवलं. जूही तिचे काही फोटो घेऊन बी. आर. चोप्रांना भेटली. त्यावेळी तिचे फोटो तर चोप्रा यांना आवडलेच. शिवाय तिची स्क्रिन टेस्टही झाली. त्यानंतर महाभारतातली ‘द्रौपदी’ ही भूमिका करण्यासाठी जूहीची निवड झाली. जूही चावला तेव्हा महाविद्यालयात शिकत होती. बी. आर. चोप्रा यांना हे कळलं की जूही आणखी एक चित्रपट करते आहे. त्यावेळी त्यांनी तिला सल्ला दिला की चित्रपट करत असशील तर मग टीव्ही मालिका करु नकोस. त्यामुळे जूही ‘द्रौपदी’ म्हणून आपल्याला टीव्हीवर दिसली नाही.

‘कयामत से कयामत तक’ आला आणि..

१९८८ मध्ये ‘कयामत से कयामत’ तक आला. आमिर खान आणि जूही चावला या दोघांच्याही प्रमुख भूमिका यात होत्या. रोमिओ अँड ज्युलिएट या शेक्सपिअरच्या कथेचा धागा उचलत हा चित्रपट लिहिण्यात आला होता. अडीच कोटींमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने तेव्हा ९ कोटींहून अधिक व्यवसाय केला होता. त्यामुळे सिनेमा सृष्टीला दोन नवे स्टार मिळाले. आमिर खान आणि जूही चावला. या दोघांची जोडी सुपरहिटही ठरली. या दोघांनी हिट चित्रपटही दिले. तसंच पहिला चित्रपट आमिरसह केल्याने जूही आणि आमिर यांची खूप चांगली मैत्री झाली. मात्र आमिर खानने ‘इश्क’ च्या सेटवर जूहीची जी खिल्ली उडवली, त्यामुळे जूही नाराज झाली. ज्यानंतर जूही आमिरशी पाच वर्षांहून अधिक काळ बोलत नव्हती.

Juhi Chawla Birth Day
कयामत से कयामत तक सिनेमातील एक दृश्य (फोटो-X)

आमिरशी जूहीने अबोला धरला होता कारण..

आमिर खान आणि जूही चावला यांच्यात खूपच चांगली मैत्री झाली होती. या दोघांनी ‘हम है राही प्यार के’, ‘लव-लव-लव’, ‘तुम मेरे हो’, ‘दौलत की जंग’, ‘आतंक की आतंक’ आणि ‘इश्क’ या चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र इश्क सिनेमाच्या शुटिंग दरम्यान आमिर खानने जूहीशी एक किळसवाणा जोक केला. मी भविष्य पाहतो तुझा हात दाखव असं आमिरने जूहीला सांगितलं. जूहीला वाटलं आमिर खरंच शिकला असेल. त्यानंतर जेव्हा जूहीने हात पुढे केला तेव्हा तो तिच्या हातावर थुंकला. जूहीला ही बाब अजिबात सहन झाली नाही. तिने राजा हिंदुस्थानी चित्रपट तर नाकारलाच शिवाय आमिरशी तिने पाच वर्षांहून अधिक काळ अबोला धरला होता. आमिरने गंमत म्हणून ही गोष्ट केली होती पण ती जूहीच्या मनाला खूप लागली. जवळपास पाच ते सात वर्षे तिने आमिरशी बोलणं सोडून दिलं होतं.

जूही आणि माधुरीची स्पर्धा

जूही चावला आणि माधुरी दीक्षित यांच्यात शीतयुद्ध होतं. त्यामुळेच या दोघींनीही त्यांचा करीअर ग्राफ उंचावत असताना कधीही एकत्र काम केलं नाही. दिल तो पागल है या सिनेमात करीश्मा कपूरने जी भूमिका केली त्यासाठी जूहीला विचारणा झाली होती. मात्र माधुरी दीक्षितच्या भूमिकेची लांबी जास्त असल्याने जूहीने हा सिनेमा नाकारला. २०१४ मध्ये ‘गुलाब गँग’ हा सिनेमा आला त्यात माधुरी आणि जूही पहिल्यांदा एकत्र दिसल्या. हा सिनेमा प्रेक्षकांना आवडला. मात्र या सिनेमातल्या माधुरीच्या अभिनयाचं समीक्षकांनी जास्त कौतुक केलं. जी बाब जूहीला आवडली नव्हती. इतकंच काय या दोघी सिनेमाच्या सेटवरही एकमेकींशी फार बोलत नव्हत्या असं या सिनेमाचा दिग्दर्शक सौमिक सेन याने सांगितलं होतं. जूही चावलाने माधुरीसह जसं काम केलं नाही तसंच एक अभिनेता आहे त्याच्याबरोबरही कधीच काम केलं नाही. तो अभिनेता आहे सलमान खान.

सलमान आणि जूही एकदाही एकत्र आले नाहीत

सलमान खान आणि जूही चावला या दोघांनी एकही सिनेमा बरोबर केला नाही. फक्त दिवाना मस्ताना या सिनेमात सलमानने कॅमिओ केला होता. ज्यामध्ये तो जूहीशी लग्न करतो असं दाखवण्यात आलं होतं. पाच मिनिटांपेक्षाही कमी काळ हे दोघं मोठ्या पडद्यावर दिसले. या दोघांनी एकही सिनेमा केला नाही याचं कारण होतं की एका सिनेमासाठी सलमानने माझ्या बरोबर जूहीला कास्ट करा असं सांगितलं होतं आणि जूहीने आमिर खानचं नाव सुचवलं होतं. सलमानला ही बाब काही रुचली नव्हती. मात्र या दोघांनीही ही बाब अनेक वर्षांनी हसण्यावारी नेली. बिग बॉसच्या एका भागात जूही चावला आली होती त्यावेळी सलमाननेच हा किस्सा सांगितला होता. त्यावेळी आता तुला माझ्या बरोबर काम करायचं असेल तर आईची भूमिका देईन असं सलमान हसत म्हणाला होता. ज्यावर जूहीने मी आईची भूमिका केली तरीही सर्वात ग्लॅमरस आई करेन असं उत्तर सलमानला दिलं होतं आणि दोघंही खळखळून हसले होते. आमिर खान आणि जूही ही जोडी जशी पडद्यावर हिट ठरली तशीच शाहरुख आणि जूही यांचीही जोडीही हिट ठरली होती.

शाहरुख बरोबरची जोडीही हिट

जूही चावलाने शाहरुखसह अनेक चित्रपटांमध्या काम केलं. या दोघांची जोडीही प्रेक्षकांना खूप भावली. ‘डर’, ‘राम जाने’, ‘डुप्लिकेट’, ‘राजू बन गया जंटलमन’, ‘येस बॉस’, ‘भूतनाथ’, ‘फिर भी दिल है हिंदुस्थानी’ अशा चित्रपटांमध्ये ही जोडी झळकली. ‘डर’मध्ये जूही आणि सनी देओल हे प्रमुख भूमिकेत होते तर शाहरुख खान अँटी हिरोच्या रोलमध्ये. मात्र तोच भाव खाऊन गेला. तसंच राजू बन गया जंटलमन ही स्टोरी एका सामान्य कुटुंबातल्या मुलाची होती. हा सिनेमा साईन केला तेव्हा तुझ्या बरोबरचा नट हा आमिर खानसारखा दिसणारा आहे असं जूहीला सांगण्यात आलं होतं. मात्र ती सेटवर गेली तेव्हा तिने शाहरुखला पाहिलं आणि दिग्दर्शकांना विचारलं हा कुठे आमिरसारखा दिसतो? मी तो चित्रपट करणार नव्हते. पण सायनिंग अमाऊंट घेतल्याने चित्रपट केला असा किस्सा जूहीनेच सांगितला होता. अशा या हरहुन्नरी जूहीचा आज वाढदिवस. तिला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!