६६ वा ग्रॅमी अवॉर्ड सोहळा आज (५ फेब्रुवारी रोजी) पार पडला. या सोहळ्यात दिग्गज तबलावादक झाकीर हुसेन व बासरीवादक राकेश चौरसिया यांना पुरस्कार देण्यात आले आहेत. भारतातील दिग्गज संगीतकार व गायक शंकर महादेवन यांना मानाचा ग्रॅमी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये हा सोहळा पार पडला. ग्रॅमी अवॉर्ड हा संगीत जगतातील सर्वात मोठा अवॉर्ड मानला जातो.

संगीतकार व ग्रॅमी अवॉर्ड विजेते रिकी केज यांनी एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. “उस्ताद झाकीर हुसेन यांनी एका रात्रीत तीन ग्रॅमी जिंकून इतिहास रचला आहे. तर राकेश चौरसियांनी दोन ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत. हे भारतासाठी ग्रॅमी अवॉर्डमधील सर्वोत्तम वर्ष आहे. या क्षणाचं मला साक्षीदार होता आलं, याचा आनंद आहे,” असं रिकी केज यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

‘शक्ती’ने ‘दिस मोमेंट’ या अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बमचा ग्रॅमी पुरस्कार जिंकला. ग्रॅमी अवॉर्ड विजेते रिकी केज यांनी एक्सवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. “शक्तीने ग्रॅमी अवॉर्ड जिंकला. या अल्बमसाठी चार भारतीय संगीतकारांनी ग्रॅमी पुरस्कार जिंकले. खूप छान. भारत प्रत्येक दिशेने चमकत आहे. शंकर महादेवन, सेल्वागणेश विनायकराम, गणेश राजगोपालन, उस्ताद झाकीर हुसेन. उस्ताद झाकीर हुसैन यांनी तीन व सर्वोत्कृष्ट बासरीवादक राकेश चौरसिया यांनी दोन ग्रॅमी अवॉर्ड्स जिंकले,” असं पोस्टमध्ये लिहिलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्रॅमी अवॉर्ड्स २०२४ मध्ये भारतीयांचा दबदबा पाहायला मिळाला. झाकीर हुसेन यांना बेला फ्लेक आणि एडगर मेयर यांच्यासह ‘पश्तो’ साठी ‘बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स’ साठी ग्रॅमी अवॉर्ड मिळाला.