‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटातून आपल्यातील अभिनयाचा बाज अद्यापही तसाच आहे हे दाखवून देणाऱ्या श्रीदेवीसाठी पुढील वर्ष खास असणार आहे. २०१७ मध्ये श्रीदेवी चित्रपट कारकिर्दीतील पन्नाशी पूर्ण करणार आहे. बॉलिवूड कारकिर्दीतील तिच्या पन्नास वर्षाच्या प्रवासाचा आनंद पती बोनी कपूर तयारीला लागले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बोनी कपूर आपल्या होम प्रोडक्शनच्या माध्यमातून श्रीदेवीचा मैलाच्या प्रवासाचा आनंद साजरा करणार आहेत. ‘मॉम’ या चित्रपटाच्या माध्यमातून श्रीदेवी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटामध्ये श्रीदेवी शिवाय नवाज्जुद्दीन सिद्दिकी आणि अक्षय कुमार देखील दिसणार आहेत.
चित्रपटसृष्टीतील पन्नाशीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या श्रीदेवीने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षात या क्षेत्रात पाऊल ठेवले. तामिळ भाषेतील ‘कंधन करुणाई’ या चित्रपटात श्रीदेवीने बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तामिळ भाषेतील हा चित्रपट १९६७ साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर श्रीदेवीने १९७८ मध्ये ‘सोलहवाँ सावन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ८० च्या दशकात जितेंद्रसोबत ‘हिम्मतवाला’ या चित्रपटातून श्रीदेवीने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. त्यानंतर ‘सदमा’, ‘नागिन’, ‘निगाहें’, ‘मिस्टर इंडिया’, ‘चालबाज’, ‘लम्हे’, ‘खुदा गावाह’ आणि ‘जुदाई’ या चित्रपटात उल्लेखनिय भूमिका साकारली आहे. २०१३ मध्ये भारत सरकारने श्रीदेवीला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता अर्थात ‘अम्मा’चे निधन झाल्यानंतर श्रीदेवीने जयललिता यांच्याशी निगडीत एक आठवण सोशल मीडियावर शेअर केली होती. बालकलाकार म्हणून तिने ‘आथि परासक्ती’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिने मुरुगन देवतेची व्यक्तिरेखा साकारली होती. तर जयललिता यांनी देवी शक्तीची व्यक्तिरेखा साकारली होती. श्रीदेवीने याच चित्रपटातील एक फोटो शेअर केला होता. ज्यात श्रीदेवी जयललिता यांच्या मांडीवर बसलेल्या दिसल्या होत्या. हा फोटो शेअर करताना श्रीदेवी म्हणाली की, सगळ्यात संस्कारी, शांत आणि हुशार स्त्री. तुमच्यासोबत काम करण्याचे भाग्य मिळाले. मी त्या कोट्यावधी लोकांप्रमाणेच मला तुमची आठवण येते.
रुपेरी पडद्यावर ८० आणि ९० चे दशक गाजवणाऱ्या श्रीदेवीने ‘जुदाई’ या चित्रपटानंतर चित्रपटसृष्टीतून काही काळ विराम घेतला होता. या काळात तिने आपल्या कुटुंबाकडे लक्ष देणे पसंत केले होते. मात्र तब्बल १५ वर्षांच्या विश्रांतीनंतर ती गौरी शिंदेच्या ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटाद्वारे मोठय़ा पडद्यावर झळकली. या चित्रपटात तिने साकारलेल्या शशी गोडबोले या भूमिकेला जगभरातून उदंड प्रतिसाद मिळाला होता. तसेच बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने खूपच चांगली कामगिरी केली होती.