प्रसिद्ध हॉलिवूड पॉप गायिका ब्रिटनी स्पीयर्स अलीकडेच तिच्या १४ वर्षांनी कंजर्वेटरशिप (संरक्षण अधिकार) पासून मुक्त झाल्यानंतर चर्चेत आहे. ब्रिटनी स्पीयर्सने या स्वातंत्र्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे आणि आता तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून रागही व्यक्त केला आहे. ब्रिटनीने सोशल मीडियावर अनेक पोस्ट्स केल्या आहेत आणि गेल्या १४ वर्षांत तिला कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागले हे सांगितले आहे. ग्रॅमी पुरस्कार विजेत्या गायिकेने सांगितले की, १४ वर्षांपासून तिच्यावर देखरेख करणारी सेक्युरिटी टीम तिच्या प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवून होती. तिने सांगितले की, कधी कपडे बदलताना तर कधी अंघोळ करतानाही अनेकदा टीमची नजर तिच्यावर असायची.

ब्रिटनी स्पीयर्सने सोमवारी इंस्टाग्रामवर काही संतप्त पोस्ट केल्या, ज्या तिने नंतर डिलिट केल्या आहेत मात्र त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत. ब्रिटनी स्पीयर्सने इतर गायिकांचं उदाहरण देत असेही सांगितले की त्यांना कधीही अशी वागणूक दिली गेली नाही. यावेळी तिने जेनिफर लोपेझचे नाव घेतले. ब्रिटनीने तिच्या इन्स्टाग्रामवर लिहिलं होतं, “मला असे वाटते की कोणीतरी जेनिफर लोपेझला दिवसाचे ८ तास, आठवड्याचे सात दिवस एका जागी बसायला सांगावे…कारमध्ये नाही. जेनिफर लोपेझला मी जे काही केले आहे ते सर्व करण्यास सांगायचे. ती हे करू शकेल असे तुम्हाला वाटते का, तिचे कुटुंबीय हे कधीच मान्य करणार नाहीत.”

आणखी वाचा- Video : विक्रमची खिल्ली उडवण्याचा डाव कपिल शर्मावरच उलटला, अभिनेत्याने केली बोलती बंद

ब्रिटनीला तिच्या वडिलांच्या आश्रयाखाली जे काही सहन करावे लागले त्याबद्दल तिचा राग आहे. या १४ वर्षांत वेळोवेळी तिच्यावर नजर ठेवणाऱ्या सुरक्षा पथकामुळे तिला ज्या गोष्टी सहन कराव्या लागल्या त्याबद्दल गायिकेने पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे. ती म्हणाली, “मला सेक्युरिटी टीमने घरातच राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. मी दरवाजा नसलेल्या घरात होते आणि त्यामुळेच टीम मला कपडे बदलताना, आंघोळ करताना नग्नवस्थेत पाहत असे. एवढंच नाही तर माझ्या बाथरुममध्येही वडिलांनी कॅमेरा लावला होता.” ब्रिटनीच्या मते १४ वर्षांत तिच्याबरोबर झालेल्या या घटनांनी तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं.

आणखी वाचा- ब्रिटनी स्पीयर्सच्या लग्नात पूर्वाश्रमीच्या पतीने केला हंगामा

ब्रिटनीने म्हटले आहे की, तिच्या कुटुंबाने तिला त्या ठिकाणी ४ महिने नजरकैदेत ठेवले होते. त्यापेक्षा हे इतके वाईट नव्हते. ती जी औषधे घेत होती ती अचानक बंद केली गेली आणि नंतर ती फक्त लिथियमवर होती. दरम्यान १ फेब्रुवारी २००८ पासून, ब्रिटनी तिचे वडील जेमी स्पीयर्स आणि लॉअर अँड्र्यू एम वॉलेट यांच्या संरक्षणाखाली होती. नोव्हेंबर २०२१ मध्ये १४ वर्षांनी तिच्या वडिलांच्या कंजर्वेटरशिपचा अधिकार न्यायाधीशांनी काढून घेतला.