लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वाचाच थरकाप उडवणारा महेश कोठारे यांचा ‘तात्या विंचू’ हा खलनायक भावला रुपेरी पडद्यावर परत येतो आहे. कोठारे दिग्दर्शित ‘झपाटलेला’ या चित्रपटाचा दुसरा भाग तब्बल २० वर्षांनतर म्हणजेच ७ जूनला प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे वैशिष्ठय़ म्हणजे हा चित्रपट थ्रीडीमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘झपाटलेला २’ हा चित्रपट मराठीतील पहिला थ्रीडी आणि सिक्वल असलेला चित्रपट ठरणार आहे. चित्रपटामध्ये आदिनाथ कोठारे, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, मधू कांबीकर, सुनील तावडे, दिलीप प्रभावळकर आणि महेश कोठारे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. थ्रीडी कॅमेरे, परदेशी तंत्रज्ञांची ‘झपाटलेला २’ तयार करण्यात मोठी मदत झाली आहे. चित्रपटाची गाणी गुरू ठाकूर यांनी लिहिली आहेत, तर त्यासाठी अवधूत गुप्ते यांचे संगीत आहे. भारतीय चित्रपटसृष्टी १०० वर्षे पूर्ण करीत असताना मराठीतील पहिला थ्रीडी चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकणार असल्याचा आनंद वाटतो, अशा शब्दात महेश कोठारे यांनी आपल्या चित्रपटाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.