बॉलिवूड कलाकार जोडप्यांच्या यादीत अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि खिलाडी कुमार यांचे नाव नेहमीच अग्रस्थानी असते ही बाब नाकारता येणार नाही. काही दिवसांपूर्वीच या दोघांनीही ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. ट्विंकल-अक्षयच्या खास उपस्थितीत पार पडलेल्या या भागाला अनेकांनीच पसंत केले होते. असे असतानाच आता बी टाऊनचे ‘मिस्टर अॅण्ड मिसेस खिलाडी’ लवकरच एका रिअॅलिटी शोच्या परिक्षक पदी दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ‘नच बलिये’ या डान्स रिअॅलिटी शोच्या परिक्षक पदासाठीची भूमिका पार पाडण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवण्यात आल्याचे वृत्त बऱ्याच संकेतस्थळांनी प्रसिद्ध केले आहे.

पण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय आणि ट्विंकल या दोघांनीही नच बलियेसाठीच्या परिक्षक पदासाठी आलेला प्रस्ताव नाकारला आहे. काही कामांसाठी आधीच दिलेल्या शब्दामुळे आणि व्यग्र वेळापत्रकामुळे सध्यातरी हे खिलाडी जोडपे नच बलियेच्या परिक्षकपदी दिसण्याच्या शक्यता कमी आहेत. दरम्यान, ‘नच बलिये’ या रिअॅलिटी शोच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना या कार्यक्रमाच्या परिक्षक पदी अक्षय आणि ट्विंकल या दोघांचाही सहभाग अपेक्षित होता. पण, तसे काहीही होईल ही शक्यता सध्या तरी कमीच आहे.

सेलिब्रेटी जोडप्यांचा सहभाग असणाऱ्या या कार्यक्रमामध्ये याआधी कधीही कोणत्याही सेलिब्रेटी जोडप्याची परिक्षक म्हणून वर्णी लागली नव्हती. ‘नच बलिये’ हा कार्यक्रम टेलिव्हीजन विश्वातील एक प्रसिद्ध कार्यक्रम असून प्रेक्षकांमध्येही या कार्यक्रमाबद्दलची उत्सुकता पाहायला मिळत आहे. तुर्तास अक्षय आणि ट्विंकलनंतर ‘नच बलिये’च्या नव्या पर्वासाठी अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि नृत्यदिग्दर्शक शामक दावर यांच्यासमोर परिक्षक पदासाठीचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याच्या चर्चा आहेत. तसेच करण सिंग ग्रोवर या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करणार असल्याचेही म्हटले जात आहे. पण, अद्यापही याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

स्टार प्लसवर लवकरच सेलिब्रेटी कपल डान्स शो म्हणजे ‘नच बलिये’चे नवे पर्व सुरु होणार आहे. या शोमध्ये दर दिवशी सहभागी होणाऱ्या नवनवीन जोडप्यांची नावे समोर येत आहेत. आतापर्यंत आगामी पर्वातील दिव्यांका त्रिपाठी, भारती सिंग, करन पटेल यांची नावे समोर आली आहेत. पण आता कुस्तीपटु गीता फोगट हिनेही या पर्वात सहभागी व्हावे अशी विनंती करण्यात आली आहे.

VIDEO: ‘जॉली एलएलबी २’ चित्रपटातील डिलिटेड सीन्स पाहिलेत का?