छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत गायकवाड घराण्याची धाकटी सून नंदिता वहिनीची व्यक्तिरेखा अल्पावधीत घराघरांत प्रसिद्ध झाली. राणा व अंजलीच्या प्रेमात नेहमी अडथळा आणणारी नंदिता वहिनी म्हणजे धनश्री काडगांवकर. ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकांमधूनही धनश्रीचा अभिनय आपण पाहिला आहे. सध्या मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या धनश्रीने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात नाटकांमधून केली होती. त्याचवेळी तिच्या आयुष्यात ‘परफेक्शन’ असणारा एक व्यक्ती आला होता. अशा या मि.परफेक्शनिस्टबद्दल खुद्द धनश्रीनेच उलगडा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलिवूडचा ‘मि. परफेक्शनिस्ट’ आमिर खान हा धनश्रीचा ऑलटाइम क्रश आहे. ‘पहला नशा’ गाण्यात तो ज्याप्रमाणे पानांवर झोपतो त्याप्रमाणे आपल्या खऱ्या आयुष्यातही असंच काहीतरी व्हावं, अशी तिची खूप इच्छा आहे. याविषयी धनश्री म्हणते की, ‘अनेक मुलींना आपल्या स्वप्नातला राजकुमार पांढऱ्या घोड्यावरून यावा असं वाटतं. पण, मला असं नाही वाटायचं. स्लो मोशनमध्ये माझं एखादं गाणं व्हावं, कोणीतरी माझ्यासोबत नृत्य करावं, असं मला नेहमी वाटायचं. कॉलेजमध्ये असताना मला एक मुलगा आवडायचा. तो गायक होता. पण, आमचं बोलणं कधी झालचं नाही. माझं आणखी एक क्रश होतं. त्याचं नाव मी आता सांगू शकत नाही. आमच्या नाटकाच्या ग्रुपमध्ये एक मुलगा होता. ते वयचं असं होतं जेव्हा मी काही बोलू शकत नव्हते आणि त्याबाबत व्यक्तही होऊ शकत नव्हते. अशा प्रकारचं माझं ते क्रश होतं. तो सतत मला पाठिंबा द्यायचा. ‘धनश्री हे आपलं नाटक आहे. तू भन्नाट परफॉर्मन्स दिलाच पाहिजेस…..’ त्याचा हा स्वभाव मला खूप आवडायचा. आपल्याला कोणीतरी एखाद्या गोष्टीसाठी इतकं प्रोत्साहित करतंय ही भावनाच खूप छान होती.

सुरुवातीला मला त्याचा खूप राग यायचा. माझ्याकडून चांगल काम करुन घेण्यासाठी तो खूप ओरडायचा. हा माणूस इतक्या लोकांसमोर माझ्यावर असा ओरडूच कसा शकतो? असं मी मनात म्हणायचे. पण, प्रयोग झाल्यानंतर त्याची त्यामागची भावना मला कळली. मी अगदी साध्या कुटूंबातून आलेले होते. पण, नाटकाच्या ग्रुपमध्ये आल्यावर मला एक गोष्ट जाणवली की, तेथे लोक कसंही बोलतात. मला या गोष्टीची अजिबात सवय नव्हती. घरचं वातावरण खूप वेगळं होतं. सतत एक-एक तासाने चहा पिण्याची आणि कोणाशीही अगदी मनमोकळेपणाने बोलण्याची सवय मला त्याच्यामुळे लागली. नाटकाची तालीम करताना काही सुधारणा करायची असली की तो माझ्यासोबत असायचा. त्यामुळे एक क्षणभर मला वाटायचं की, हीच ती व्यक्ती आहे का? पण, प्रत्यक्षात गोष्टी अगदी वेगळ्या असतात. माझ्या आयुष्यातले हे काही क्षण आहेत जे मी विसरू शकत नाही. मी अभिनय क्षेत्रात काहीतरी करू शकते, ही हिंमत माझ्यामध्ये त्याच्यामुळे आली. त्यामुळे आजही मी त्याला खूप मानते.

चैताली गुरव, chaitali.gurav@indianexpress.com

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Celebrity crush tuzhat jeev rangala fame nandita vahini aka dhanashri kadgaonkar perfect crush story
First published on: 21-03-2017 at 01:05 IST