रेश्मा राईकवार
एक पैलवान तरुण आणि एक सडपातळ, सुंदर झुम्बा प्रशिक्षक तरुणी एकमेकांना भेटतात. पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडतो. तिचीही त्याच्या प्रेमाला ना नसते, पण.. अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘चंदीगढ करे आशिकी’ या प्रेमपटात हा ‘पण’च महत्त्वाचा ठरला आहे. आजवर हिंदूी चित्रपटांच्या साचेबद्ध प्रेमकथांमध्ये इतका धाडसी प्रयत्न कोणीही केलेला नाही.
चंदीगढचा पैलवान मनू मुंजाल (आयुषमान खुराणा) आणि अंबालाची तरुणी मानवी ब्रार (वाणी कपूर) यांची प्रेमकथा या चित्रपटात पाहायला मिळते. मनूचं पूर्ण कुटुंबच चिवित्र म्हणावं असं आहे. त्याची आई लहानपणीच वारली आहे. त्याच्या दोन्ही बहिणी त्याच्यावर अगदी बारीक लक्ष ठेवून आहेत. वडिलांना इतक्या वर्षांनंतर कोणाचा तरी सहवास हवासा वाटू लागला आहे. त्यांच्या आयुष्यात आलेली स्त्री मुसलमान असल्याने दुसऱ्या लग्नाचं धाडस कसं करायचं? हा पेच त्यांच्यासमोर आहे. मनूचं लग्न झालं तर आपला मार्ग मोकळा होईल असं त्यांना वाटतं. मात्र त्याला प्रेमापेक्षा सँण्डीला हरवत चंदीगढचा सर्वोत्कृष्ट पैलवान होण्याचा बहुमान मिळवायचा आहे. या सगळय़ा घिसाडघाईत अखेर मनूच्या आयुष्यात एक सुंदर, स्मार्ट.. चंदीगढच्या भाषेत सांगायचं तर तिथल्या गर्भश्रीमंतांच्या घरातून आलेली मानवीसारखी सर्वागसुंदर तरुणी येते. त्यांची प्रेमकथा वेगात सुरू होते, पण ही प्रेमकथा लग्नात रूपांतरित होण्याआधीच मानवी आपला भूतकाळ त्याच्यासमोर ठेवते. आणि मग ही सर्वागसुंदर तरुणी अचानक मनू आणि त्याच्या बहिणींनाही नकोशी होते. ही आशिकी पुढे रंगते आहे की नाही? हा खरंतर या चित्रपटाचा विषय नाही. पण विषय कितीही वेगळा आणि धाडसी असला तरी तो याच सरधोपट प्रेमपटांच्या मार्गावरून पुढे सरकतो.
लिंगभेद या विषयाला विविधांगी पैलू आहेत. आजपर्यंत जिथे स्त्री-पुरुष हा प्राथमिक लिंगभेद मिटवणं आपल्या समाजात शक्य झालेलं नाही. तिथे लिंगबदल करून घेतलेल्या व्यक्तींचा विचार किंवा त्यांचा आपल्या कुटुंबात-आयुष्यात समावेश हा आपल्या पायाखालची जमीन सरकवणारा विषय आहे. शिक्षणानेही लैंगिकतेबद्दलचे आपले विचार, मनोधारणा यांच्यात फारसा फरक पडलेला नाही. दिग्दर्शक म्हणून हा विषय चित्रपटातून मांडण्याचे धाडस अभिषेक कपूरच करू जाणे. आत्तापर्यंत रूढ किंवा चाकोरीबद्ध विषयांवर अभिषेक कपूर यांनी चित्रपट केलेले नाहीत. काश्मीर समस्या असो वा हिंदूू-मुस्लीम तेढ.. समकालीन घटना, विषय कधी मैत्री वा प्रेमकथेतून मांडण्यावर त्यांचा भर राहिला आहे. हे विषय मांडताना अगदी निर्भीडपणे त्यांनी चित्रपटातून मांडले आहेत. मात्र ‘चंदीगढ करे आशिकी’मध्ये हा निर्भीडपणा एकतर तोकडा पडला आहे किंवा मग हलक्याफुलक्या पद्धतीनेच तो लोकापर्यंत पोहोचेल, असा काहीसा दिग्दर्शकाचा विचार असावा. प्रेमकथा म्हणून साहजिकच तरुणाईपर्यंत हा विषय चटकन पोहोचेल यात शंका नाही, पण मर्यादित विचारातून केलेल्या सरधोपट मांडणीमुळे लेखन आणि दिग्दर्शन दोन्ही पातळीवर चित्रपट अगदीच साधारण ठरतो.
विषयाच्या धाडसाबरोबरच त्यानुरूप कलाकारांची निवड या मुद्दय़ावर दिग्दर्शक १०० टक्के यशस्वी ठरला आहे. आत्तापर्यंत चॉकलेट बॉय म्हणून समोर आलेला, एरव्ही किरकोळ देहयष्टी आणि साध्या-सरळ स्वभावाच्या तरुणाच्या भूमिकेतून आयुषमान यशस्वी ठरला आहे. इथे पैलवान म्हणून त्याने शारीरिक बदलासाठी घेतलेली मेहनत दिसते. पंजाबी मनू शरीराने आडदांड असला तरी मनाने हळवाच आहे. शिवाय, पारंपरिक कुटुंबपद्धतीबद्दलचे विचारही तसेच आहेत. त्यामुळे त्याच्या आयुष्यात जेव्हा प्रेमाचा हा कठीण पेपर सोडवण्यासाठी येतो तेव्हा त्याच्या पोटात पडलेला खड्डा आयुषमानने आपल्या अभिनयातून सहजतेने रंगवला आहे. मनू जितका बावळट आहे, त्याच्या कित्येक पटीने स्मार्ट, चंट असलेल्या मानवीच्या स्वभावातही हळवा कोपरा आहे. अर्थात तिने तिच्या आयुष्याचं वास्तव स्वीकारलं आहे, समाज-कुटुंबाकडून टक्केटोणपे खाऊनही तिने त्या मर्यादांवर मात केली आहे. तिला हवं असलेलं आयुष्य ती जगते आहे. मानवीची व्यक्तिरेखा खूप सक्षमतेने लिहिली गेली आहे. या व्यक्तिरेखेसाठी अभिनेत्री वाणी कपूरची निवडही चपखल ठरली आहे. तिचं दिसणं, शारीर व्यक्तिमत्त्वाचा तिने स्वत:ही या भूमिकेसाठी उत्तम वापर करून घेतला आहे. अभिनेत्री म्हणून पूर्ण लांबीच्या सक्षम भूमिकेत काम करण्याची संधी तिच्याकडे पहिल्यांदाच चालून आली आणि त्या संधीचं तिने सोनं केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बाकी जुन्याजाणत्यांपैकी एक कंवलजीत वगळता फारसं काही करण्यासारखं कोणाच्या वाटय़ाला आलेलं नाही. इतर बहुतांशी व्यक्तिरेखांसाठी दिग्दर्शकाने नेहमीपेक्षा काही वेगळय़ा चेहऱ्यांची निवड केली असल्याने तोही ताजेपणा चित्रपटात आहे.
लिंगबदल केलेल्या व्यक्तींच्या व्यथा-वेदनांविषयी किंवा त्यांनी स्वत:ला कसं स्वीकारावं याबद्दल चित्रपट फारसं भाष्य करत नाही. हा चित्रपट त्यांच्याबद्दल असलेल्या समाजाच्या भावनांबद्दल, त्यांना समाजाने स्वीकारावं याबद्दल जास्त बोलतो. पण मुळात हा विषय लिंगबदल करणाऱ्या व्यक्तीच्या भावभावनांपासून सुरू व्हायला हवा. त्याउलट, त्यांचं समाजातील अस्तित्व मान्य करून फक्त समाजाकडून त्यांच्या स्वीकार्यतेबद्दल मांडताना काही तांत्रिक दृश्यांच्या मदतीने या विषयाची फोड दिग्दर्शकाने केली आहे. ही वरवरची मांडणी या विषयाची व्याप्ती पाहता पुरेशी ठरलेली नाही. विषय मांडण्यापुरता हा धाडसी प्रयत्न मर्यादित राहिला असल्याने एक सर्वसाधारण प्रेमकथेपलीकडे ही आशिकी पोहोचत नाही.
चंदीगढ करे आशिकी
दिग्दर्शक – अभिषेक कपूर कलाकार – आयुषमान खुराणा, वाणी कपूर, कंवलजीत सिंग, अंजन श्रीवास्तव, अभिषेक बजाज, गौरव आणि गौतम शर्मा.