Chandrayaan-2 Moon Landing : जवळपास दीड महिन्यापूर्वी २२ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून झेपावलेले “चांद्रयान-२” अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत चंद्राजवळ पोहोचले. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे विक्रम लँडरचा संपर्क तुटला. त्यामुळे भारतीयांचा काहीसा हिरमोड झाला. पण ISRO च्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. बॉलिवूड गायक अदनान सामी याने देखील ISRO च्या कामगिरीचे कौतुक करत त्यांना धीर दिला.

“पृथ्वीपासून चंद्रापर्यंतच्या ३ लाख ८४ हजार किलोमीटर पैकी ३ लाख ८३ हजार ९९८ किलोमीटरचा प्रवास आपण पार केला. केवळ २ किलोमीटर अंतर पार करायचे राहून गेले. केवळ २ किलोमीटरमुळे आमची मोहीम अयशस्वी झाली. मात्र चंद्राच्या इतके जवळ जाणेही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या वैज्ञानिकांनी आपले संपूर्ण कौशल्य, धैर्य व दृढनिश्चय पणाला लावून या मोहिमेवर काम केले होते. आम्हा सर्व भारतीयांना त्यांचा अभिमान आहे.” अशा शब्दात त्यांनी भारतीय वैज्ञानिकांचे कौतुक केले.

दरम्यान, या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण देश क्षणांक्षणांचं अपडेट पाहत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संपूर्ण देशाने रात्रभर जागून अनुभव घेतला. मात्र, विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटपर्यंत पोहोचले असताना संपर्क तुटला. विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर शास्त्रज्ञांबरोबरच संपूर्ण देशाचा श्वास रोखला गेला. यावेळी उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना धीर दिला. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ट्विट करत वैज्ञनिकांचं मनोधर्य वाढवले.