हिंदी सिनेमातील व्यक्तिरेखा, संवाद, त्यातील गोष्ट, स्टार कलावंत, गाणी, संगीत, त्यातला मेलोड्रामा या सगळ्याच गोष्टींनी प्रेक्षकाचे आयुष्य व्यापले आहे. भारतीय प्रादेशिक भाषांतील सिनेमांपेक्षा हिंदी सिनेमा शंभर वर्षे पूर्ण करतोय, म्हणून प्रेक्षक आणि हिंदी सिनेमा यांचे नाते आगळ्या प्रकाराने उलगडण्याचा प्रयत्न ‘बॉम्बे टॉकीज’ या सिनेमाद्वारे करण्यात आलाय. शंभर वर्षांचे ‘सेलिब्रेशन’ मात्र त्यात नाही. फक्त गाण्यातून हे ‘सेलिब्रेशन’ करून ‘साँग अ‍ॅण्ड डान्स’ म्हणजे हिंदी सिनेमाचा अविभाज्य भाग आहे असे दाखविण्याचा प्रयत्न केला गेलाय. परंतु, प्रत्यक्षात चार छोटय़ा छोटय़ा गोष्टी दाखवून त्यातून सिनेमाचा सर्वसामान्य भारतीयावर होत असलेला परिणाम दाखवायचा स्तुत्य प्रयत्न चार दिग्गज दिग्दर्शकांनी केलाय. अर्थात मुंबई आणि हिंदी सिनेमा यांचे अतूट नाते प्रकर्षांने मांडले आहे ते योग्यच म्हणावे लागेल. रुपेरी पडद्याचे अप्रूप अधोरेखित करणारा सिनेमा आहे.
करण जोहर (‘अजीब दास्तां है ये’), दिबाकर बॅनर्जी (स्टार), झोया अख्तर (शीला की जवानी) आणि अनुराग कश्यप (मुरब्बा) असे चार लघुपट एकामागून एक दाखवून त्यातून सिनेमा आणि प्रेक्षक यांचे नाते, सर्वसामान्यांवर असलेला सिनेमाचा पगडा असे उलगडले आहे. प्रत्यक्षात ‘बॉम्बे टॉकीज’ पाहिल्यानंतर भविष्यातील बॉलीवूड सिनेमाचे बदलते स्वरूप असे असेल असे सूतोवाचही केलेय की काय, असेही वाटून जाते.
‘बॉम्बे टॉकीज’ सिनेमा सुरू होतानाचे शीर्षक गीत ‘अक्कड बक्कड बंबे बो’पासूनच सिनेमा शताब्दीनिमित्त हा चित्रपट केलाय हे प्रेक्षकाला लगेच समजते. पहिल्या लघुपटात राणी मुखर्जी आणि तिचा नवरा रणदीप हुडा या वरवर दिसणाऱ्या सुखी जोडप्याच्या आयुष्यात राणीच्या ऑफिसमध्ये काम करणारा साकिब सलिमने साकारलेला समलिंगी तरुण येतो आणि त्या तिघांचे आयुष्यच बदलून जाते. करण जोहरने या लघुपटात नेहमीची चाकोरी सोडून खऱ्या लोकेशन्सवर चित्रीकरण केले आहे.
चार लघुपटांमध्ये करण जोहर दिग्दर्शित ‘अजीब दास्तां है ये’ हा लघुपट व्यावसायिक सिनेमाचे दर्शन घडवितोच, पण करण जोहरच्या दिग्दर्शन शैलीतील वेगळेपणही रेखाटतो. वास्तविक सिनेमा शताब्दीशी या लघुपटाचा तसा थेट संबंध नाही. परंतु, वेगळ्या वाटेने सिनेमा जातो आहे, भविष्यातही जाणार आहे याची झलक करण जोहर दाखवितो. उर्वरित तिन्ही लघुपटांमध्ये सिनेमा माध्यमाचा प्रभाव जनमानसावर किती आणि कसा आहे त्याचे दर्शन घडते. विशेष म्हणजे या चित्रपटात स्टार कलावंत असूनही चित्रपटाची प्रसिद्धी चार दिग्दर्शकांच्या नावानेच अधिक करण्यात आली. सिनेमा पाहताना हे कारण नक्कीच प्रेक्षकाला समजेल.
अनुराग कश्यपची ‘मुरब्बा’ म्हणजेच ‘मुरंबा’ ही गोष्ट सर्वाधिक मजेदार आहे, तर झोयाचा लघुपट लहान मुलांवर असलेला स्टार कलावंतांचा प्रभाव दाखवितो. ‘स्टार’ हा दिबाकर बॅनर्जीचा लघुपट सर्वसामान्य माणसाची हृदयस्पर्शी कहाणी अतिशय साध्या सोप्या पण मार्मिक पद्धतीने दाखवितो. यातील पुरंदर ही व्यक्तिेरखा आणि ती साकारणारा नवाझुद्दिन सिद्दिकी प्रेक्षकाच्या नक्कीच लक्षात राहील असा आहे. ‘मुरब्बा’ लघुपटातील विनीतकुमार सिंगने साकारलेला विजय ही व्यक्तिरेखाही प्रेक्षकांची सहानुभूती मिळवून जाते. एका हळुवार आणि सूचक पद्धतीने सिनेमाचा प्रेक्षकांच्या जीवनावर होत असलेला परिणाम, त्याच्या जगण्याच्या उमेदीवर सिनेमाचा प्रभाव सिनेमा दाखवितो. मुंबई महानगरी, इथले जगणे, याचा प्रभावही हिंदी सिनेमावर किती आहे तेही सिनेमा प्रकर्षांने दाखवितो. तद्दन व्यावसायिक गणितांमध्ये मात्र सिनेमा यशस्वी होत नाही. सिनेमाची जातकुळी गंभीरतेकडे झुकणारी आहे. दिग्दर्शकांनी सिनेमाचे भविष्यवेधी सूतोवाच अतिशय हळुवार पद्धतीने केले आहे. चांगला सिनेमा आणि वाईट सिनेमा असे सिनेमाचे दोनच प्रकार असतात याकडे अंगुलीनिर्देश करणारे हे चारही लघुपट आहेत. सिनेमा शताब्दीचा गौरव म्हणून ते पाहायला हवेत.
बॉम्बे टॉकीज
निर्माते- व्हायकॉम१८ मोशन पिक्चर्स, अशी दुआ
दिग्दर्शक- करण जोहर (अजीब दास्तां है ये), दिबाकर बॅनर्जी (स्टार), झोया अख्तर (शीला की जवानी), अनुराग कश्यप (मुराब्बा ).
संगीत- अमित त्रिवेदी
कलावंत- राणी मुखर्जी, रणदीप हुडा, साकिब सलीम, नवाझुद्दिन सिद्दिकी, विनीतकुमार सिंग, सदाशिव अमरापूरकर, लविन गोठी, रणवीर शौरी, नमन जैन, कतरिना कैफ, अमिताभ बच्चन व अन्य.