Mandar Bhide : २७ ऑगस्टला मुंबईसह राज्यभरात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाचं आगमन झालं. दीड दिवसांच्या घरगुती गणपतींना गुरुवारी निरोप देण्यात आला. मुंबईतल्या विलेपार्ले या ठिकाणी विसर्जन करण्यासाठी कार घेऊन गेलेल्या भाविकांना दंड भरावा लागला. याबाबत स्टँड अप कॉमेडियन मंदार भिडेने एक व्हिडीओ पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. गणपतीच्या दिवशी मराठी लोकांच्या भावनेशी खेळू नका असं त्याने म्हटलं आहे.

काय आहे मंदार भिडेची पोस्ट?

“मला गणपतीत तुमचा मूड खराब करण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण या गोष्टीबाबत बोललं पाहिजे. विले-पार्ल्यातल्या हनुमान रोड या ठिकाणी हेडगेवार मैदान आहे. त्या मैदानात गणपती विसर्जनासाठी कृत्रीम तलावाची व्यवस्था मागच्या १८ ते १९ वर्षांपासून होते आहे. सुजाण नागरिक म्हणून आम्ही त्याच ठिकाणी गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन करतो. २००७ पासून आम्ही त्या ठिकाणी विसर्जनासाठी जात असतो. दरवर्षी गाडी लावतो, बाप्पाचं विसर्जन करुन घरी परत येतो. १० ते १५ मिनिटांत हे सगळं होतं. अत्यंत सुंदर व्यवस्था तिकडे करण्यात आलेली आहे. “

मराठी लोकांवर दादागिरी करणं बंद करा-मंदार भिडे

मंदार भिडे पुढे म्हणतो, “या वर्षी पहिल्यांदाच ज्या गाड्या उभ्या होत्या त्यांना क्लँप लावून दंड वसूल करण्यात आला आहे. माझी एवढीच विनंती आहे की गणपतीच्या दिवशी मराठी लोकांच्या भावनेशी खेळू नका. आमच्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. गणेश उत्सव हा आमचा महत्त्वाचा सण आहे. त्यादिवशी जर तुम्ही आमच्यावर नियम लादले, तर मग नियम सगळ्यांसाठी लागू झाले पाहिजेत. त्यांच्या सणांच्या दिवशी जे ट्रिपल सीट फिरतात, हेल्मेट न घालता फिरतात अशा सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. त्यांनाही दंड ठोठवा तुमच्यात जर हिंमत असेल तर. फक्त मराठी लोकांवर दादागिरी करणं बंद करा. गणपतीच्या दिवशी तर अजिबात आमच्यावर दादागिरी करु नका. गणपतीच्या दिवशी तर आम्ही हे अजिबात खपवून घेणार नाही. जो काही दंड भरायचा होता तो मी भरला आहे, कारण आम्हाला कायद्याचा आदर आहे. पोलिसांचा आदर आहे. शिवाय पोलिसांबाबत माझी काही तक्रार नाही कारण त्यांना जे वरुन ऑर्डर आल्या असतील त्याच ते पाळत आहेत. जे काही राज्यकर्ते फ्लेक्स लावून क्रेडिट घेता त्यांना सांगणं आहे की हा फालतूपणा बंद झाला पाहिजे. मराठी लोकांच्या भावनेशी मुळीच खेळू नका.” असं म्हणत मंदार भिडेने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला आहे.

नेटकऱ्यांनी काय म्हटलं आहे?

मंदार भिडेने पोस्ट केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तुमचा राग निवडणुकीतून व्यक्त करा असं एकाने म्हटलं आहे. लाडकी बहीण योजनेची वसुली चालली आहे असं म्हणत आणखी एकाने कमेंट केली आहे. तुमची भूमिका योग्य आहे तुम्ही बरोबर केलंत असं काही जण मंदारला सांगत आहेत. हिंदूंच्या सणांच्या वेळी दादागिरी सुरु आहे असंही काहींनी म्हटलं आहे. या पोस्टवर विविध कमेंट येत आहेत.