‘टवाळा आवडे विनोद’ ही अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. परंतु सध्या या टवाळांची मागणी दिवसेंदिवत वाढताना दिसत आहे. यासाठी प्रत्येक वाहिनी आपल्याकडे एखादा तरी विनोदी कार्यक्रम असावा, याकडे काटेकोरपणे लक्ष पुरवित आहे. ‘कॉमेडी नाइटस् विथ कपिल’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून कपिल शर्मा हा सध्याचा आघाडीचा विनोदवीर भलताच फॉर्मात आहे. त्याच्या या कार्यक्रमाला यूटय़ुबवर सर्वाधिक हिटस् आहेत. छोटय़ा पडद्यावरचा हा कॉमेडीचा बादशहा दिवसाला तब्बल पाच लाख रुपये बिदागी घेत असल्याची चर्चा आहे.
‘कॉमेडी शो’च्या माध्यमातून बऱ्याचदा चित्रपटांचे प्रमोशन्स आणि इतर अनेक गोष्टी साध्य करता येत असल्यामुळेही अशा प्रकारच्या शोंची मागणी वाढू लागली आहे. दुसऱ्या वाहिनीचा सुपरहिट कलाकार आपल्याकडे ओढण्यासाठी वाहिन्यांमध्ये अहमहमिका लागली आहे. त्यामुळे संबंधित कलाकाराला हवी ती रक्कम वाहिन्या देत असल्यामुळे विनोदवीरांना सुगीचे दिवस आले आहेत. कॉमेडीच्या वाढत्या मागणीमुळे कलाकारांची मात्र पुरती भंबेरी उडाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नेमके कुठे जावे, अशी या कलाकारांची पंचाईत झाल्याचे दिसते.
विनोदवीरांना आलेल्या सुगीच्या दिवसांबद्दल बोलताना कृष्णा अभिषेक म्हणतो, सध्या कॉमेडीला खरोखर उत्तम दिवस आले आहेत. आम्ही महिन्यातील किमान २२ दिवस काम करतो. पूर्वी असे नव्हते. चित्रिकरण, काही लाइव्ह कार्यक्रम आणि परदेशातील शो आदींमुळे साधारण दिवसाला काही लाखांमध्ये आम्हाला मिळणारे मानधन नक्कीच सुखावह असल्याचेही त्याने आवर्जुन नमूद केले.
सध्याच्या घडीला कॉमेडीचे सुपरस्टार म्हणुन कपिल शर्मा, कृष्णा अभिषेक, सुदेश मेनन आणि भारती सिंग यांची चलती अधिक प्रमाणात आहे. या प्रत्येकाचे एका दिवसांचे दर किमान साडेतीन लाखांपासून ते पाच लाखांपर्यंत आहे. चॅनल्स यांना इतकी रक्कम देण्यासाठी कुठेही आखडता हात घेत नाही. कॉमेडीच्या प्रत्येक शोसाठी नामांकित कलाकारांसह त्यांचे सहकलाकारही उत्तम पैसे कमवतात. म्हणूनच बऱ्याच कलाकारांनी कॉमेडीला अधिक प्राधान्य दिलेले आहे. यामध्ये उपासना सिंग, अली असगर आदी कलाकारांचा समावेश आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Aug 2013 रोजी प्रकाशित
विनोदवीरांची चलती..
‘टवाळा आवडे विनोद’ ही अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. परंतु सध्या या टवाळांची मागणी दिवसेंदिवत वाढताना दिसत आहे.
First published on: 16-08-2013 at 10:47 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Comedy show golden age as demand high for tv