करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सुविधा सोडल्या तर सारं काही बंद आहे. त्यामुळे चित्रपट, मालिका, नाटकं यांच चित्रीकरणही बंद करण्यात आलं आहे. परिणामी अनेक सेलिब्रिटी आपल्या घरीच थांबले आहेत. त्यामुळे सध्या ते चित्रपटाचं चित्रीकरण, प्रदर्शन, प्रमोशन अशी कोणतीच काम करु शकत नाहीयेत. विशेष म्हणजे त्यांना हा फावला वेळ मिळाला असून या वेळेचा ते सदुपयोग करत आहेत. यामध्येच छोट्या पडद्यावरील गुरुनाथ अर्थात अभिजीत खांडकेकरदेखील त्यांची आवड जोपासत आहे. सध्या तो घरात राहून त्याची स्वयंपाक करण्याची आवड पूर्ण करत आहे.
अभिजीतला नवनवीन पदार्थ करुन पाहण्याची विशेष आवड आहे. त्यामुळे सध्या क्वारंटाइनमध्ये मिळालेल्या वेळेचा तो सदुपयोग करत आहे. या दिवसांमध्ये तो जास्तीत जास्त वेळ स्वयंपाक घरात घालवत असून वेगवेगळे पदार्थ करत आहे. यामध्येच त्याने ‘जिरा कुकीज’ हा नवीन पदार्थ केला असून याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
अभिजीतने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो काही तरी भन्नाट पदार्थ करत असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला तो कोणता पदार्थ करतोय हे त्यालादेखील माहित नव्हतं. सहज प्रयोग म्हणून तो हा पदार्थ करत होता. मात्र नंतर या कुकीज तयार झाल्या. आणि त्याने या पदार्थाला ‘जिरा कुकीज’ असं नाव दिलं. हा व्हिडीओ पोस्ट करण्यासोबतच त्याने अभिनेता अद्वैत दादरकर आणि सचिन देशपांडे यांना नॉमिनेट केलं आहे.
दरम्यान, या व्हिडीओमध्ये त्याने त्याच्या आवडीनिवडींबद्दलही सांगितलं आहे. इतकंच नाही तर घरासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या, घरातील प्रत्येकाची काळजी घेणाऱ्या स्त्रियांचं देखील त्याने कौतूक केलं आहे. त्यांचे आभार मानले आहेत. तसंच आपल्या घरातील स्त्रियांचे एकदा तरी आभार माना असंही त्याने सांगितलं आहे. सध्या अभिजीतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहे.