करोना विषाणूमुळे सध्या देशभरात भीतीचं वातावरण आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणं नागरिक टाळत आहेत. शाळा, महाविद्यालये, मॉल, चित्रपटगृह बंद ठेवण्यात आले असून फिल्मसिटीदेखील १९ ते ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ‘इम्पा’ या संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपट, मालिका, जाहिराती यांचं चित्रीकरण काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचं दिसून येत आहे. मात्र तरीदेखील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचं चित्रीकरण सुरु रहावं यासाठी मालिकेच्या निर्मात्यांनी सरकारकडे मागणी केली आहे.

मालिकेचे निर्माते आसित मोदी यांनी ट्विटरवर दोन पोस्ट शेअर करत मालिकेचं चित्रीकरण सुरु ठेवण्याची मागणी केली आहे. तसंच सरकारने जे नियम सांगितले आहेत त्यांचं पालन करण्याचं आश्वासनही दिलं आहे.

“सर, आम्हाला या परिपत्रकाविषयी अजून काही स्पष्ट झालेलं नाही. अचानकपणे फिल्मिसिटीतलं आमचं चित्रीकरण थांबवलं आहे. आम्ही सेटवर स्वच्छता राखत असून अगदी मोजकीच माणसं काम करत आहोत. तसंच सरकारच्या सगळ्या नियमांचं पालन करत आहोत, त्यामुळे कृपया मालिकेचं चित्रीकरण सुरु ठेवण्याची आम्हाला उद्यापर्यंत परवानगी मिळावी”, असं असित मोदी यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणतात, “सर, कृपया आम्हाला या परिपत्रकाविषयी मार्गदर्शन करा. फिल्मसिटीतलं सगळं चित्रीकरण खरंच बंद झालं आहे? एमआयडीसी, कंपन्या, सरकारी कार्यालये, खासगी कार्यालये आजपासूनच बंद आहेत? सरकारने घालून दिलेल्या प्रत्येक नियमाचं आम्ही पालन करत आहोत. त्यामुळे आम्ही कमी जणांच्या युनिटमध्ये काम करु शकतो?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, असिम यांच्या टि्वटवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. काहींना असिमचं मत योग्य वाटतंय. तर काही जणांनी त्यांना ट्रोल केलं आहे. “सर, कृपा करुन तुम्ही नागरिकांच्या आरोग्याचा विचार करा, चित्रीकरण काय सुरुच राहिलं. त्यामुळे शक्य असेल तर सगळ्यांना सुट्टी द्या. कारण प्रत्येकाला लांबचा प्रवास करुन यावं लागतं”, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.