देशात करोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजनांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. आज या लॉकडाउनचा १० वा दिवस आहे. विशेष म्हणजे प्रशासनाकडून अनावश्यक कारणांसाठी बाहेर पडू नका, असं बजावलं असतानादेखील काही नागरिक मुद्दाम या आदेशाचं उल्लंघन करत आहेत. त्यामुळे अशा नागरिकांवर अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्येच विनोदवीर सुनील ग्रोवरनेदेखील एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. घरात रहाल तर दारूची दुकानं लवकर उघडतील असं त्याने म्हटलं आहे.
नागरिकांनी घरात रहावं यासाठी सुनीलने हटके पद्धतीने आवाहन केलं आहे. जर तुमची इच्छा असेल की दारुची दुकानं लवकरच सुरु व्हावीत. तर सध्या शांतपणे घरीच बसा. उगाच अनावश्यक कारणांसाठी बाहेर पडू नका. कारण नसताना बाहेर पडलात तर आपल्यावर ओढावलेल्या संकटात भर पडेल आणि तुम्हाला हवी असलेली दारुची दुकानंही सुरु व्हायला तितकाच वेळ लागेल, असं सुनीलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, सुनीलने हा व्हिडीओ मजेशीर अंदाजात तयार केला असून सध्या तो चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे करोनामुळे केंद्र सरकारने लॉकडाउन केल्यापासून दारुची दुकाने व बार बंद झाले. त्यामुळे अनेक तळीराम अस्वस्थ झाले असून ते दारुच्या शोधात सतत घराबाहेर पडताना दिसतात.