दृश्यप्रतिमांच्या भाषेतून अतिशय साधेपणाने आणि  शब्दबंबाळपणा टाळून विषय मांडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणारे चित्रपट आपल्याकडे दुर्मीळ असतात. आपली न्यायालये कशी चालतात याचे चकाचक चित्रणच पाहायची सवय आपल्या चित्रपटांनी लावली आहे. न्यायालयांचं थेट वास्तववादी चित्र टोकदार पद्धतीने कोर्टने दाखविले आहे. कोणाताही अभिनेवश न आणता कथासूत्राबरोबरच न्यायाधीश, सरकारी वकील, बचाव पक्षाचे वकील, आरोपी, साक्षीदार, न्यायालयातील कर्मचारी ह्य़ांच्या आयुष्यावर देखील एक झगझगीत प्रकाश टाकत सामाजिक वास्तवावर टोकदार भाष्य करणारा ‘कोर्ट’ हा चित्रपट आहे.
चित्रपटाच्या शीर्षकावरून हिंदी चित्रपटांतील न्यायालय आणि न्यायाधीशाच्याही आवेशाने बोलणारा आरोपी असलेला ‘हिरो’ आणि कोर्ट म्हणजे ‘तारीख पे तारीख’, ‘शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये’, ‘मेरे काबिल दोस्त’, ‘मेरे मुवक्किल’, ‘मी लॉर्ड’ असे संवाद न आठवले तरच नवल. परंतु, या ‘फिल्मी’ संवादांच्या पलिकडे जाऊन भारतीय न्यायालय नक्की कसे असते, प्रत्येक न्यायालयात ‘आंधळी न्यायदेवता’ असते का किंवा काय याचे मर्मज्ञ दर्शन या चित्रपटाने सर्वसामान्य प्रेक्षकांसमोर आणले आहे. केवळ एका खटल्याची सुनावणी दाखवितानाच समाजाच्या मानसिकतेचा सूक्ष्मपणे समाचार घेण्याचा वाखाणण्याजोगा यशस्वी प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.
नारायण कांबळे हे दलित, विद्रोही चळवळीतील लोकशाहीर आहेत. विद्रोही जलसांमधून सामाजिक भाष्य करणारी गाणी लिहिणे, त्याचे गायन करणे आणि उर्वरित वेळात मुलांच्या शिकविण्या करून पोटाची खळगी भरणे हे काम नारायण कांबळे करीत आहेत. कांबळे यांचे एक गाणे ऐकून एका सफाई कामगाराने म्हणे आत्महत्या केली असा आरोप ठेवून त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात येते. न्यायाधीश सदावर्ते यांच्यासमोर खटल्याची सुनावणी करताना सरकारी वकील नूतन या कलमांचा काथ्याकूट मांडतात, नारायण कांबळे यांचे वकीलपत्र घेतलेले बचाव पक्षाचे वकील विनय व्होरा अतिशय शांतपणे युक्तिवाद ऐकून नंतर त्यावर आपले मत मांडतात, पुढची तारखी पडते, त्या तारखेला पुन्हा सुनावणी होते. दरम्यान न्यायाधीश आरोपीला सुरुवातीला न्यायालयीन कोठडी आणि नंतर पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देतात.rv03 सर्वसाधारणपणे एक खटला उभा राहिल्यानंतर (विशेषत: चित्रपटात) त्याचा निकाल काय लागणार याची उत्सुकता सर्वाना असते. न्यायालयाचे रूक्ष कामकाज, किचकट कलमे, त्याचे आवेशपूर्ण वाचन करणारे सरकारी वकील, ज्या आरोपासाठी आरोपीला न्यायालयात उभे केले आहे त्याच्यावर आरोप सिद्ध न होताही त्याला भोगावी लागणारी शिक्षा यातून नाटय़ उभे करीत अखेरीस निकाल लावला जातो. परंतु, या चित्रपटात लेखक-दिग्दर्शकाने अंतिम निकाल दाखविण्याच्या मिषाने न्यायालय कामकाज, समाजमन, न्यायालयाशी संबंधित व्यक्तींचे न्यायालयातील आणि न्यायालयाबाहेरील वागणूक, त्यातील विसंगती आणि एकूणच समाजात आहे रे आणि नाही रे वर्गातील बदललेले जगणे, त्यातील तफावत याचे नेमकेपणाने दर्शन घडविले आहे.
न्यायाधीश, सरकारी वकील आणि बचाव पक्षाचे वकील यांची जीवनशैली, ते व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करीत असताना त्यांचे वागणे, विचार करणे आणि न्यायालयाच्या चौकटीबाहेरच्या खासगी आयुष्यातील त्यांचे वागणे, विचार करणे हे दाखविण्यातून दिग्दर्शकाने समाजाची मानसिकता, वास्तव, विसंगती, चांगुलपणा, केवळ कर्मकांड, भंपकपणा, बेगडी युक्तिवाद करणे, सहृदयता असे मानवी स्वभावाचे गुणविशेष मांडून प्रेक्षकाला अंतर्मुख करण्याचा परिणामकारक प्रयत्न केला आहे. rv02न्यायाधीशांच्या भूमिकेतील प्रदीप जोशी, विनय व्होरा ही बचाव पक्षाच्या वकिलाची भूमिका करणारे चित्रपटाचे निर्माता व अभिनेता विवेक गोम्बर आणि सरकारी वकिलाच्या भूमिकेतील गीतांजली कुलकर्णी यांनी सहजाभिनयाने लेखक-दिग्दर्शकाला अभिप्रेत होते ते परिणामकारकरित्या प्रेक्षकाच्या मनाला भिडण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. न्यायालयीन प्रक्रिया जवळून पाहत असलेल्या आणि न्यायालयीन खटल्याच्या निमित्ताने वारंवार न्यायालयात जाणाऱ्या प्रेक्षकांना चित्रपट भिडेल एवढे नक्की.
चित्रपट मराठी असला तरी मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती अशा चारही भाषांमधील संवाद यात आहेत. विशेषत: इंग्रजी आणि गुजराती संवाद प्रेक्षकांना समजण्यासाठी चित्रपटकर्त्यांनी मराठी उपशीर्षके द्यायला हवी होती, असे राहून राहून वाटते.
चित्रपटात उभे केलेले न्यायालय, पोलीस ठाणे अधिक वास्तववादी करण्यामध्ये प्रॉडक्शन डिझायन करणारे सोमनाथ पाल, पूजा तलरेजा यांनाही गुण द्यायला हवेत. संवादांचा भडिमार, प्रसंग उत्कंठावर्धक करण्यासाठी वापरले जाणारे भडक पाश्र्वसंगीत, अनाठायी गाणी अशी सगळी सिनेप्रेक्षकांना अभिप्रेत असलेली गृहितके मोडून काढत विषयाला धरून नेमकेपणाने मांडणी करीत आपल्याला जे मांडायचे आहे ते कोणताही अभिनिवेश न आणता मांडत भाष्य करण्यासाठी दिग्दर्शकाला पैकीच्या पैकी गुण द्यायला हवेत.

कोर्ट
निर्माता – विवेक गोम्बर
लेखक – दिग्दर्शक – चैतन्य ताम्हाणे
छायालेखक – मृणाल देसाई
संगीतकार – संभाजी भगत
संकलक – रिखाव देसाई
प्रॉडक्शन डिझाईन – सोमनाथ पाल, पूजा तलरेजा
कलावंत – वीरा साथीदार, विवेक गोम्बर, गीतांजली कुलकर्णी, प्रदीप जोशी, उषा बने, शिरीष पवार व अन्य.