रिषभ शेट्टी यांच्या ‘कांतारा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत आहे. मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन होणार असल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपट सर्वप्रथम कन्नड भाषेमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. पुढे प्रेक्षकांच्या वाढत्या प्रतिसादानंतर निर्मात्यांनी चित्रपट इतर भाषांमध्ये डब करुन प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भविष्यात या चित्रपटाचा सिक्वेल येऊ शकतो अशी माहिती खुद्द रिषभ शेट्टी यांनी एका कार्यक्रमामध्ये दिली होती. ‘कांतारा’मधील ‘वराह रुपम’ हे गीत फार विशेष आहे. या गाण्यामध्ये श्रीविष्णू यांच्या वराह अवताराची स्तुती करण्यात आली आहे. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहे. चित्रपटामध्ये या गाण्याला खास महत्त्व आहे. अजनीश लोकनाथ यांनी हे गीत संगीतबद्ध केले आहे. तर साई विघ्नेश यांनी त्यासाठी पार्श्वगायन केले आहे.

आणखी वाचा – “मी तिच्या प्रेमात पडलो…” प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीसाठी विजय देवरकोंडाची खास पोस्ट

काही दिवसांपूर्वी ‘थाईकुडम ब्रिज’ (Thaikkudam Bridge) या केरळमधील म्युझिकल बँडने कांताराच्या निर्मात्यांवर गाणं चोरल्याचा आरोप केला होता. ‘वराह रुपम’ हे गाणं २०१७ साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘नवरसम’ या गाण्याची कॉपी असल्याचे त्यांनी म्हटले होते. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. सध्या सोशल मीडियावर त्यांना पाठिंबा मिळत आहे. तसेच त्यांनी या चित्रपटाच्या निर्मात्यांच्या विरोधामध्ये न्यायालयात धाव घेतली होती.

आणखी वाचा – Video : ‘बिग बॉस’च्या मंचावर कतरिना कैफ व सलमान खानचा जबरदस्त डान्स, ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावरील व्हिडीओ व्हायरल

दरम्यान केरळच्या कोझिकोड सत्र न्यायालयाने चित्रपटामधील ‘वराह रुपम’ हे गाणं काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशामुळे चित्रपटगृह आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर चित्रपटाचे स्क्रीनिंग सुरु असताना हे गीत दिसणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बँडच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरच्या संबंधित पोस्टमध्ये “कोझिकोड जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांनी कांतारा चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार, अ‍ॅमेझॉन, यूट्यूब, स्पॉटिफाय, विंक म्युझिक, जिओ सावन आणि इतर माध्यमांना थाईकुडम ब्रिजच्या परवानगीशिवाय वराह रुपम हे गाणं वाजवण्यास सक्त मनाई केली आहे”, असे लिहिले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Court orders kantara makers to stop playing varaha roopam song in theatres and ott platforms yps
First published on: 29-10-2022 at 09:36 IST