चौकटीबाहेरच्या कथानकांची निवड करण्यासाठी म्हणून बॉलिवूडमध्ये ओळखल्या जाणाऱ्या काही नावांच्या यादीत एका अभिनेत्रीची वर्णी लागते. ती अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्मा. ‘बबली गर्ल’ म्हणूनही प्रसिद्ध असणारी अनुष्का तिच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांचा थरकाप उडवण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘परी’ या चित्रपटातून अनुष्का होळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून, त्यात असणारी दृश्यं आणि मनात एक वेगळ्या प्रकारची भीती पेरणारा हा टिझर पाहून अनुष्काचा पती, क्रिकेटवर विराट कोहली यानेही चाहत्यांना एक इशारा दिला आहे.

विराटनेही त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ‘परी’चा टिझर पोस्ट केला असून, ‘मी फक्त पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करुन देतोय, ही परीकथा नाहीये….’ असा इशारा त्याने दिला आहे. विराटने अनोख्या अंदाजात अनुष्काच्या आगामी चित्रपटाचा टिझर शेअर केला आहे. सोशल मीडियावरही ही ‘परी’ ट्रेंडमध्ये आली आहे. अनुष्का शर्मा, परमब्रता चॅटर्जी यांच्या अभिनयाची झलक या टिझरमधून पाहायला मिळतेय. तर त्यातील काही दृश्यं पाहता बरेच प्रश्नही मनात घर करुन जात आहेत. अर्थात चित्रपटाच्या दिग्दर्शकांना हेच अपेक्षित असावं. कारण, या भयपटाविषयी जितकी उत्सुकता आणि कुतूहलाचं वातावरण शिगेला पोहोचेल तितकीच या चित्रपटाची वातावरण निर्मितीसुद्धा होईल यात शंका नाही.

वाचा : अखेर दीपिकाने केला खुलासा, ‘पद्मावत’मधील हे दृश्य साकारताना तिचेही डोळे पाणावले

‘परी’च्या निमित्ताने अनुष्काच्या अभिनयाची एक वेगळी बाजू पाहण्याची संधी मिळणार आहे. ‘फिल्लौरी’मध्ये तिने साकारलेली भूताची (विनोदी) भूमिका आणि ‘परी’मधील भूमिका पाहता यामध्ये बराच फरक जाणवतो. त्याशिवाय एक भयपट म्हणून एखाद्या चित्रपटात आवश्यक असणाऱ्या बऱ्याच गोष्टींची लहानशी झलक ‘परी’च्या टिझरमधून पाहायला मिळतेय. २ मार्च २०१८ला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, बॉक्स ऑफिसवर ‘परी’चा प्रभाव पाहायला मिळणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पण, तोवर एकच सांगणं, होळीच्या दिवसांमध्ये जरा जपून…