मराठी सिनेमात सध्या हाताळले जाणारे विषय आणि त्याला प्रेक्षकांचा मिळणारा भरभरून प्रतिसाद पाहता हिंदी सिनेसृष्टीतले अनेक चित्रपट निर्माते मराठी चित्रपटांकडे वळतायत. हिंदी सिनेसृष्टीतील निर्माती संगीता अहिर यांनी मराठी चित्रपट निर्मितीत पदार्पण केलयं. येत्या २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणा-या ‘दगडी चाळ’ सिनेमाची निर्मिती त्यांनी केली आहे. “गुड्डू रंगीला” आणि नुकताच रिलीजच्या वाटेवर असलेला ‘कॅलेंडर गर्ल्स’ या सिनेमाच्या निर्मात्या संगीता अहिर यांचा मराठी सिनेनिर्मितीचा पहिलाच प्रयत्न आहे.  “एक उत्तम सिनेमा बनवण्यासाठी खूप प्लॅनिंग कराव लागतं. मुळात आपल्या योजना आणि कल्पना पारदर्शी असाव्या लागतात. त्या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये किती गरज आहे. या सगळ्या गोष्टींचा प्रामुख्याने विचार व्हायला हवा. लेखक, दिग्दर्शक, कलाकार मंडळीना सिनेमात कोणत्या गोष्टींची गरज आहे याची नेमकी दखल निर्मात्यांनी घेतली पाहिजे”, असे निर्मात्या संगीता अहिर यांनी सांगितले. दगडी चाळ हे नाव ऐकल तरी मनात त्या चाळी विषयी उत्सुकता निर्माण होते, पण हीच चाळ आपल्याला पडद्यावर २ आॅक्टोबरला पाहायला मिळणार आहे. मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी, पूजा सावंत, संजय खापरे यांची प्रमुख भूमिका असून चंद्रकांत कणसे यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. अमितराजने सिनेमाला संगीत दिले असून सुरेश सावंत आणि नरेश परदेशी या दोघांनी मिळून कथा लिहिली आहे तर प्रवीण कांबळे आणि अजय ताम्हाणे यांनी सिनेमाचे संवाद लिहिले आहेत. प्रतिकूल परिस्थितीत अपघाताने वाममार्गात अडकलेल्या एका सामान्य तरुणाच्या आयुष्याची कथा सिनेमात चित्रित करण्यात आली आहे. मराठी सिनेसृष्टीच्या कारकिर्दीत दगडी चाळ हा सिनेमा प्रेक्षकांसाठी उत्कंठावर्धक असेल यात शंका नाही…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dagdi chawl sangeeta ahir
First published on: 21-09-2015 at 12:19 IST